Join us  

Sukanya Samruddhi : 'सुकन्या समृद्धी'तील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी, १ तारखेपासून बदलणार 'हे' नियम 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 4:23 PM

Sukanya Samriddhi Yojna: सुकन्या समृद्धी योजनेचे नियम १ ऑक्टोबर २०२४ पासून मोठ्या प्रमाणात बदलणार आहेत. जाणून घ्या काय होणारेत बदल.

Sukanya Samriddhi Yojna: सुकन्या समृद्धी योजनेचे नियम १ ऑक्टोबर २०२४ पासून मोठ्या प्रमाणात बदलणार आहेत. नव्या नियमानुसार दोनपेक्षा जास्त खाती असतील तर अतिरिक्त खातं बंद केलं जाणार आहे. खातं उघडण्यातील विसंगती सुधारणं हा या नियमांचा उद्देश आहे. नियमांनुसार कायदेशीर पालक किंवा नैसर्गिक पालकांनी न उघडलेली खाती आता योजनेच्या मूळ मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी पालकत्वाचं अनिवार्य हस्तांतरण करावं लागणार आहे. दरम्यान, या योजनेनुसार केवळ कायदेशीर पालक किंवा नैसर्गिक पालकच ही खाती उघडू शकतात आणि मॅनेज करू शकतात.

काय आहे प्लॅन?

सुकन्या समृद्धी खाते कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकेच्या शाखेत उघडता येतं. हे खाते मुलीच्या जन्माच्या वेळी किंवा वयाच्या १० व्या वर्षापर्यंत उघडता येतं. खातं उघडताना एका आर्थिक वर्षात कमीत कमी १००० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपये जमा करता येतात. ही सरकारी योजना आहे. मोदी सरकारच्या बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानांतर्गत ही योजना सुरू करण्यात आली होती. सध्या सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर ८.२० टक्के आहे. केवळ २५० रुपयांच्या कमीत कमी रकमेतून तुम्ही सुकन्या खातं उघडू शकता. खातं उघडण्याच्या तारखेपासून २१ वर्षे पूर्ण झाल्यावर हे खातं मॅच्युअर होतं.

खातं उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रं

आवश्यक ओळखपत्रांमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र किंवा इतर कोणत्याही सरकारनं जारी केलेल्या ओळखपत्राचा समावेश आहे. खातं उघडणाऱ्या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक असतात.

  • सुकन्या समृद्धी योजनेचं खातं उघडण्याचा फॉर्म.
  • मुलीचा जन्म दाखला.
  • मुलीच्या आई-वडिलांचा किंवा कायदेशीर पालकांचा फोटो.
  • पालक किंवा पालकाची केवायसी कागदपत्रे (ओळख आणि पत्त्याचा पुरावा).
टॅग्स :सरकारगुंतवणूक