Join us  

बाजाराचे डोळे आता अमेरिकेकडे; गुंतवणूकदार बाजारात गुंतवणुकीसाठी उत्सुक...!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 10:54 AM

आगामी सप्ताहात अमेरिकेसह तीन बँकांच्या व्याजदरवाढीबाबतचा निर्णय होणार आहे.

- प्रसाद जोशी 

नवीन विक्रम संवतचा सकारात्मक वातावरणाने शुभारंभ झाल्यानंतर गत सप्ताहात बाजाराने तेजी दाखविली. जगभरातील शेअर बाजार या काळामध्ये वाढलेले दिसून आले. बाजारातील वातावरण सकारात्मक राहिले. जगभरात अपेक्षेपेक्षा वाढीचा वेग जास्त राहिलेला दिसून आला. त्याचप्रमाणे चलनवाढीची भीतीही काही प्रमाणात कमी झाल्याने बाजार वाढले. 

आगामी सप्ताहात अमेरिकेसह तीन बँकांच्या व्याजदरवाढीबाबतचा निर्णय होणार आहे. मात्र शेअर बाजार हा अमेरिकेच्या व्याजदरवाढीकडे डोळे लावून बसलेला दिसून येतो. सप्ताहाच्या अखेरीस भारतीय रिझर्व्ह बँकेकडूनही व्याजदराबाबतची घोषणा होणार असून, त्याचा परिणाम बहुदा पुढील आठवड्यात दिसून येईल. गत सप्ताहाचा शुभारंभ मुहूर्ताच्या सौद्यांनी झाला. यावेळी बाजाराने चांगली उसळी घेतलेली दिसून आली. गुंतवणूकदार बाजारात गुंतवणुकीसाठी उत्सुक असल्याचे दिसून आले. 

अमेरिकेच्या  फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरवाढीची घोषणा होणार आहे. देशातील जीडीपी, पीएमआय, जीएसटी संकलन, वाहन विक्री आदी महत्त्वाच्या आकडेवारीही जाहीर होणार आहेत. अमेरिकेकडून यावेळी व्याजदरात काही प्रमाणात कमी वाढ होणे अपेक्षित आहे. तसे झाल्यास बाजार त्यावर चांगली प्रतिक्रिया देऊ शकतो. 

परकीय वित्तसंस्थांकडून मोठी खरेदी 

गत सप्ताहात बाजारात परकीय वित्तसंस्थांकडून खरेदी, तर देशांतर्गत वित्तसंस्थांकडून विक्री झालेली दिसून आली. परकीय वित्तसंस्थांनी सप्ताहामध्ये ३९८६.२५ कोटी रुपयांची खरेदी केली, तर देशांतर्गत वित्तसंस्थांनी १२४०.४७ कोटींची विक्री करून नफा कमाविण्याचा मार्ग पत्करला. असे असले तरी, ऑक्टोबर महिन्याचा एकत्रित विचार करता परकीय वित्तसंस्थांनी बाजारातून ४६६७.७ कोटी रुपये काढून घेतले.

टॅग्स :गुंतवणूकअमेरिका