India Gdp Growth: आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारताचा आर्थिक विकास दर 8 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत मजबूत वाढ नोंदवण्यात आली. या आधारावर या आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादनाचा (GDP) विकास दर 8 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता आहे.
काय म्हणाले मुख्य आर्थिक सल्लागार?
NCAER तर्फे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना व्ही अनंत नागेश्वरन म्हणाले की, 'आयएमएफने आर्थिक वर्ष 2023-24 साठी 7.8 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. पहिल्या तीन तिमाहीतील वाढीचा वेग पाहिला, तर जीडीपीचा दर आठ टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता स्पष्टपणे दिसते.'
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा अंदाज
2023-24 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या 7.5 टक्के वाढीच्या रिझर्व्ह बँकेच्या (RBI) अंदाजापेक्षा हे प्रमाण जास्त आहे. ते म्हणाले की, 'आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा चालू आर्थिक वर्षाचा अंदाज 6.8 टक्के आहे. परंतु, भारतीय रिझर्व्ह बँकेला 2024-25 या आर्थिक वर्षात सात टक्के जीडीपी वाढ अपेक्षित आहे.' आर्थिक वर्ष 2024-25 नंतरच्या वाढीबाबत ते म्हणाले की, 'भारताचा विकास दर 6.5 ते 7 टक्क्यांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.'