Forex Reserve RBI:भारताच्या परकीय चलन साठ्यात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या महिन्याभरात भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात 16.54 अब्ज डॉलर्स, म्हणजेच 1.37 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. सध्या हा आकडा चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, भारताच्या परकीय संपत्तीचा साठा 600 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेला आहे. शुक्रवारी आलेल्या आकडेवारीत 2.82 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी सांगितले की, 8 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा US $ 2.816 अब्ज वाढून US $ 606.859 अब्ज झाला आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये देशाचा परकीय चलन साठा 645 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या उच्चांकावर होता. याचा अर्थ सध्या देशाचा परकीय साठा उच्चांकापेक्षा 38 अब्ज डॉलर्स मागे आहे. गेल्या वर्षी सेंट्रल बँकेने रुपयाची किंमत वाढवण्यासाठी परकीय चलन साठा खर्च केला होता, त्यामुळे साठ्यात घट दिसून आली आहे.
10 नोव्हेंबर रोजी देशाचा परकीय चलन साठा केवळ $590.32 अब्ज होता. त्यानंतर त्यात सातत्याने वाढ होत आहे. 17 नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा $595.40 अब्ज झाला. 24 नोव्हेंबर रोजी त्यात आणखी वाढ झाली आणि हा $597.94 अब्ज झाला. तर, 1 डिसेंबर रोजी परकीय चलन साठ्याने $600 अब्जची पातळी ओलांडली आणि $604.04 अब्ज गाठली. 8 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात त्यात आणखी वाढ झाली आणि देशाचा परकीय चलन साठा आता 606.859 डॉलरवर आहे.