Join us  

धनत्रयोदशीला भारतीयांची जोरदार खरेदी; ₹२०००० कोटींचं सोनं, ₹२५०० कोटींच्या चांदीची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 10:06 AM

Dhanteras Gold Sell : धनत्रयोदशीच्या दिवशी देशभरातील बाजारपेठांमध्ये कमालीची चमक दिसून आली आणि लोकांनी जबरदस्त खरेदी केली.

Dhanteras Gold Sell : धनत्रयोदशीच्या दिवशी देशभरातील बाजारपेठांमध्ये कमालीची चमक दिसून आली आणि लोकांनी जबरदस्त खरेदी केली. सोन्या-चांदीबरोबरच वाहनं, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं, भांडी, कपडे यासह अन्य उत्पादनांची तुफान खरेदी-विक्री झाली. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या (कॅट) म्हणण्यानुसार, यावर्षी धनत्रयोदशीला सुमारे ६० हजार कोटी रुपयांचा व्यवसाय झाल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी सुमारे ५० हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. 

२२५०० कोटींच्या सोन्या-चांदीची विक्री

ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ्स फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज अरोरा यांच्या म्हणण्यानुसार भाव वाढले असले तरी या धनत्रयोदशीला सोन्या-चांदीची जोरदार विक्री झाली. देशभरात सुमारे २० हजार कोटींचं सोनं आणि सुमारे २,५०० कोटी रुपयांची चांदी खरेदी करण्यात आली. सुमारे २५ टन सोन्याची विक्री झाली, ज्याची किंमत २० हजार कोटी रुपये आहे. त्याचप्रमाणे देशभरात २५० टन चांदीची विक्री झाली, ज्याची किंमत सुमारे अडीच हजार कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी ही उलाढाल सुमारे २५ हजार कोटी रुपये होती.

चिनी वस्तूंच्या विक्रीत घट

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या म्हणण्यानुसार देशभरातील बाजारपेठांमध्ये 'व्होकल फॉर लोकल'चा प्रभाव दिसून आला. चिनी वस्तूंची खरेदी कमी होती. जवळपास सर्व खरेदी भारतीय वस्तूंची होती. एका अंदाजानुसार दिवाळीशी संबंधित चिनी वस्तूंच्या विक्रीत घट झाल्यानं चीनला सुमारे १ लाख २५ हजार कोटी रुपयांचा फटका बसलाय. विशेष म्हणजे दिवाळीत पंतप्रधानांनी व्होकल फॉर लोकलचे आवाहन केलं होतं.

वाहनांच्या विक्रीत वाढीची शक्यता

वाहन उद्योग संघटना फाडानुसार दिवाळीदरम्यान वाहनांची विक्री दुप्पट होण्याची शक्यता आहे. दसऱ्या दरम्यान, ही वाढ ५ ते १२ टक्क्यांदरम्यान होती. चारचाकी वाहनांच्या विक्रीत १० टक्के तर दुचाकींच्या विक्रीत १५ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.

टॅग्स :सोनंदिवाळी 2024