Indian Forex Reserve : भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात सलग 7व्या आठवड्यात घट झाली आहे. RBI च्या ताज्या आकडेवारीनुसार, भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात सुमारे 18 अब्ज डॉलरची घट झाली आहे. विशेष बाब म्हणजे, गेल्या 50 दिवसांत भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात एकूण 47 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे.
सलग 7 आठवडे घट
RBI ने सांगितले की, 15 नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा US$ 17.761 बिलियनने कमी होऊन US$657.892 बिलियन झाला आहे. 8 नोव्हेंबर रोजी संपलेल्या शेवटच्या आठवड्यात, एकूण साठा US$6.477 अब्जने घसरून US$675.653 अब्ज झाला. तर सप्टेंबरच्या अखेरीस भारताचा परकीय चलन साठा 704.885 अब्ज यूएस डॉलर्सच्या उच्चांकावर होता.
सोन्याच्या साठ्यातही घट
15 नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन मालमत्तेतही(फॉरेन करेन्सी असेट्स) घट झाली आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, परकीय चलन संपत्ती US $ 15.548 अब्जने घटून US $ 569.835 अब्ज झाली आहे. तर, या आठवड्यात सोन्याचा साठा US $ 2.068 अब्जने घसरून US $ 65.746 अब्ज झाला आहे. याशिवाय, स्पेशल ड्रॉइंग राइट्स (SDRs) US $ 94 मिलियनने घसरून US $ 18.064 अब्ज झाले आहे.