लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : किमती वाढल्याने घरखर्चाचे गणित भागत नसल्याने कुटुंबांकडून केल्या जात असलेल्या बचतीवरही विपरीत परिणाम झाला आहे. मागील तीन वर्षात कुटुंबांकडून केल्या जाणाऱ्या घरगुती बचतीत तब्बल नऊ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. केंद्र सरकारच्या सांख्यिकी मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीतून हे समोर आले आहे.
वार्षिक आधारावर विचार केला असता गेल्या पाच वर्षात कुटुंबांच्या घरगुती बचतीचा हा नीच्चांक ठरला. २०२०-२१ मध्ये कुटुंबांच्या बचतीने २३.२९ लाख कोटींचा उच्चांक गाठला होता. बचतीत सातत्याने घट होत आहे.
बँकांकडून घेतलेल्या कर्जाचा बोजाही तीन वर्षात वाढला आहे. २०२२-२३ कुटुंबांवरील बँकांचे कर्ज ११.८८ लाख कोटी इतके झाले. २०२०-२१ मध्ये त्यांच्यावरील बँकांचे कर्ज ६.०५ लाख कोटी इतके होते.
उसनवारी वाढली तब्बल ७३ टक्क्यांनी महागाई वाढल्याने रोजचा घरखर्च आणि इतर बिले भागवण्यासाठी अनेक कुटुंबांना उसनवारीचा मार्ग पत्करावा लागला आहे. २०२२-२३ मध्ये उसनवारी तब्बल ७३ टक्क्यांनी वाढली. २०२१-२२ उसनवारी ९ लाख कोटी होती. हीच देणी १५.६ लाख कोटीवर गेली आहेत.