तुम्ही पोस्ट ऑफिसच्या आरडीमध्ये (RD) गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सणासुदीच्या काळात सरकारनं पोस्ट ऑफिसच्या ५ वर्षांच्या रिकरिंग डिपॉझिटवरील व्याजदरात वाढ केली आहे. १ ऑक्टोबरपासून नवे दर लागू होतील. आत्तापर्यंत तुम्हाला ५ वर्षांच्या आरडीवर ६.५ टक्के दराने व्याज मिळत होते, पण १ ऑक्टोबरपासून तुम्हाला ६.७ टक्के दराने व्याज मिळेल. सरकारनं त्यात २० बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही आता ₹२०००, ₹३००० किंवा ₹ ५००० ची मासिक आरडी सुरू केली, तर तुम्हाला नवीन व्याजदरासह किती परतावा मिळेल हे जाणून घेऊ.
२ हजारांच्या गुंतवणूकीवर किती परतावा
तुम्ही ५ वर्षांसाठी दरमहा २ हजारांची आरडी सुरू करणार असाल, तर तुम्ही एका वर्षात २४ हजार रुपये आणि ५ वर्षात १,२०,००० गुंतवाल. अशा स्थितीत तुम्हाला नवीन व्याजदरासह म्हणजेच ६.७ टक्के व्याजासह २२,७३२ रुपये मिळतील. अशा परिस्थितीत, ५ वर्षांनंतर, तुमची गुंतवणूक केलेली रक्कम आणि व्याजाची रक्कम एकत्रित केली जाईल आणि तुम्हाला एकूण १,४२,७३२ रुपये मिळतील.
३ हजारांच्या गुंतवणूकीवर किती परतावा
जर तुम्हाला दरमहा ३ हजारांची आरडी सुरू करायची असेल, तर तुम्ही एका वर्षात ३६,००० आणि ५ वर्षात एकूण १,८०,००० रुपयांची गुंतवणूक कराल. पोस्ट ऑफिस आरडी कॅल्क्युलेटरनुसार, नवीन व्याजदरांनुसार, तुम्हाला ३४,०९७ रुपये व्याज म्हणून मिळतील आणि मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण २,१४,०९७ रुपये मिळतील.
५ हजारांच्या गुंतवणूकीवर किती परतावा
तुम्ही दरमहा ५ हजारांची आरडी सुरू केल्यास, तुम्ही ५ वर्षांत एकूण ३ लाखांची गुंतवणूक कराल. पोस्ट ऑफिस आरडी कॅल्क्युलेटरनुसार, तुम्हाला ६.७ टक्के दरानं ५६,८३० रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे, तुम्हाला मॅच्युरिटीवर ३,५६,८३० रुपये मिळतील.