Join us  

१५ हजारांची बचत मिळवून देईल २.२३ लाखांचं पेन्शन, जाणून घ्या कसा घेऊ शकता फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 4:15 PM

पाहा नक्की कसं घेऊ शकता महिन्याला २ लाखांवर पेन्शन.

नोकरी संपल्यानंतर आपला पोटापाण्याच्या खर्च भागवण्यासाठी रक्कम आवश्यक असतेच. ती तेव्हाच मिळेल जेव्हा आपल्याला कोणत्याही पेन्शन योजनेत सामील होण्याची संधी असेल. अशीच एक योजना म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम किंवा NPS. ही एक नवीन प्रकारची पेन्शन योजना आहे जी जुनी पेन्शन योजना किंवा OPS ची जागा घेते. एनपीएस ही सामाजिक सुरक्षा प्रदान करणारी गुंतवणूक योजना आहे. या योजनेत, गुंतवणूकदाराला दोन वेगवेगळ्या फंड डेट आणि इक्विटीमध्ये पैसे जमा करण्याची संधी मिळते. गुंतवणूक करणारी व्यक्ती त्याच्या रकमेपैकी 75 टक्के रक्कम इक्विटीमध्ये आणि 25 टक्के डेटमध्ये गुंतवते. या आधारे नंतर पेन्शन दिली जाते. तुम्हालाही निवृत्तीनंतर चांगली पेन्शन हवी असेल तर NPS मध्ये केव्हा आणि किती गुंतवणूक करावी लागेल हे पाहू.

एनपीएसमध्ये ५०-५० च्या प्रमाणात डेट आणि इक्विटी फंडात पैसे गुंतवले तर नंतर मोठी रक्कम मिळू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीने एनपीएसमध्ये दरमहा 15,000 रुपये जमा केले, तर 30 वर्षांनंतर त्याला दरमहा 2.23 लाख रुपये पेन्शन मिळेल. जेव्हा गुंतवणूकदाराचे वय 60 वर्षे होईल तेव्हा त्याला दरमहा 2.23 लाख रुपये पेन्शन मिळेल. यासोबतच कर सवलतीचा लाभ स्वतंत्रपणे मिळणार आहे.

कर सवलत मिळणारजोपर्यंत कर बचतीचा संबंध आहे, गुंतवणूकदारास आयकर कलम 80C अंतर्गत एका वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंत कर बचतीचा लाभ मिळू शकतो. NPS मध्ये गुंतवलेल्या पैशावर 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर कपातीचा दावा केला जाऊ शकतो. याशिवाय, NPS मध्ये गुंतवलेल्या पैशावर कलम 80CCD(1B) अंतर्गत 50,000 रुपयांच्या करात सूट घेतली जाऊ शकते.

SWP मध्ये गुंतवणूक करावी लागेलसमजा एखादी व्यक्ती दरमहा NPS मध्ये 15,000 रुपये जमा करते. 40 आणि 60 च्या प्रमाणात डेट आणि इक्विटीमध्ये पैसे जमा केले जात आहेत. 30 वर्षे पैसे जमा केल्यानंतर, गुंतवणूकदाराला दरमहा 68,380 रुपये पेन्शन मिळू लागेल. याशिवाय, मॅच्युरिटीवर 2.05 कोटी रुपयांची एकरकमी रक्कम देखील उपलब्ध होईल. या गुंतवणूकदाराने पुढील 25 वर्षांसाठी सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅनमध्ये 2.05 कोटी रुपये जमा केले, तर त्याला दरमहा 1.55 लाख रुपये सहज मिळतील. अशाप्रकारे, जर तुम्ही आधीच मिळालेले 68,000 रुपये पेन्शन 1.55 लाखांच्या पेन्शनसोबत सिस्टिमॅटिक विथड्रॉल प्लॅनमध्ये जोडले तर गुंतवणूकदाराला दरमहा 2.23 लाख रुपये मिळतील.

(टीप - कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी त्या क्षेत्रातील जाणकारांचा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

टॅग्स :गुंतवणूकनिवृत्ती वेतन