Join us

Investment Tips : नव्या वर्षात मुलीच्या नावे करा गुंतवणूक, केवळ २५० रुपयांपासून करू शकता सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 1:03 PM

करातही मिळणार सूट, पाहा कशी सुरू कराल गुंतवणूक

मुलींच्या भविष्याच्या दृष्टीने केंद्र सरकारनं अनेक योजना सुरु केल्या आहेत. सुकन्या समृद्धी योजना या योजनांपैकीच एक आहे. केंद्र सरकारनं २०१५ मध्ये या योजनेची सुरूवात केली होती. नव्या वर्षाच्या मुहूर्तावर तुम्हीही जर मुलीचे आई वडील असाल तर यात गुंतवणूक करू शकता. यामध्ये, मुलगी २१ वर्षांची झाल्यावर मॅच्युरिटी रक्कम मिळते. अल्पबचत योजनेतील ही सर्वाधिक व्याज देणारी योजना आहे. ही योजना दीर्घकालीन गुंतवणुकीला प्रोत्साहन देते. मुलींच्या नावाने सुरू असलेल्या या योजनेत तुमचे पैसे तीन पटीने वाढण्याची हमी आहे. परंतु तुम्ही केवळ दररोज ४५ रूपयांची बचत करून तुम्ही ७ लाख रुपयांचा फंड उभारू शकता.

जर तुम्हाला मुलीच्या भविष्यासाठी मोठी रक्कम उभारायची असेल तर सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करणं फायद्याचं ठरेल. सरकारनं मुलींच्या भविष्याचा विचार करत २०१५ मध्ये या योजनेची सुरूवात केली होती. तुम्ही सुरूवातील २५० रूपयांच्या छोट्या रकमेतून अकाऊंट सुरू करू शकता. सरकार तुम्हाला जमा रकमेवर ७.६० टक्क्यांच्या दरानं व्याज देते.

दररोज ४५ रूपयांची बचतजर तुम्हाला ७ लाखांचा फंड उभारायचा असेल तर तुम्हाला प्रत्येक वर्षाला १६५०० रूपये जमा करावे लागतील. महिन्याला पाहिलं तर जवळपास १३७५ रुपयांची रक्कम तुम्हाला जमा करावी लागेल, म्हणजेच दिवसाला ४५ रूपयांची बचत. जर तुम्ही वार्षिक १६५०० रूपये गुंतवाल तर २१ वर्षांनी मॅच्युरिटीवर तुम्हाला सात लाख रूपयांची रक्कम मिळेल. यामध्ये तुमचं कॉन्ट्रिब्युशन २ लाख २ लाख ४८ रूपये असेल. या योजनेअंतर्गत एका आर्थिक वर्षादरम्यान तुम्ही १.५ लाख रूपये जमा करू शकता. तसंच आयकर अधिनियम १९६१ च्या ८० सी अंतर्गत १.५ लाखांच्या गुंतवणूकीवर तुम्हाला करात सूटही मिळेल.

कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेसाठी अकाऊंट सुरू करू शकता.

टॅग्स :गुंतवणूकपोस्ट ऑफिस