Govt Retirement Scheme: निवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आणि स्वतंत्र राहायचं असेल तर नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) तुमच्यासाठी गुंतवणुकीचा उत्तम पर्याय ठरू शकते. प्रत्यक्षात केंद्र सरकारनं २००४ साली सरकारी कर्मचाऱ्यांसाठी याची सुरुवात केली होती, पण पाच वर्षांनंतर २००९ मध्ये ती सर्वसामान्य नागरिकांसाठीही खुली करण्यात आली. या योजनेअंतर्गत तुम्ही दीर्घकाळ बचत करू शकता आणि निवृत्तीनंतर निश्चित पेन्शनचा लाभ घेऊ शकता.
एनपीएसमध्ये कोण गुंतवणूक करू शकतो?
नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) ही एक प्रसिद्ध निवृत्ती बचत योजना आहे, त्यात गुंतवणूक करून तुम्ही तुमचं भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करू शकता. या योजनेची खासियत म्हणजे यात गुंतवणूक केल्यानं तुम्हाला करसवलत, गुंतवणुकीत लवचिकता आणि गुंतवणुकीचे अनेक प्रकारचे पर्याय मिळतात. १८ वर्षे ते ७० वर्षे वयोगटातील कोणताही नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो.
मुलांसाठीही गुंतवणूक योजना
याशिवाय गेल्या वर्षी जुलै २०२४ मध्ये अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मुलांसाठीही बचत योजनेची घोषणा केली होती. या योजनेचं नाव एनपीएस वात्सल्य असं आहे. या योजनेत १८ वर्षांखालील मुलांचे पालक आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी दरमहा किमान एक हजार रुपयांची गुंतवणूक करू शकतात, तर गुंतवणुकीसाठी कमाल रकमेची मर्यादा नाही.
टियर १ आणि टियर २ खात्यांमध्ये गुंतवणुकीचे नियम
टियर १ खातं हे एक अनिवार्य खातं आहे आणि प्रामुख्याने सेवानिवृत्तीनंतरच्यॉा बचतीसाठी आहे. यात करसवलत मिळते आणि ही दीर्घकालीन गुंतवणूक करावी लागते. त्याच वेळी, टियर २ खाते एक ऐच्छिक खातं आहे, ज्यात गुंतवणूक आणि पैसे काढण्यासाठी अधिक स्वातंत्र्य आणि तरलता असते.
ऑनलाइन गुंतवणूकीची प्रक्रिया?
जर तुम्ही एनपीएस खातं उघडलं असेल तर तुम्ही गुंतवणुकीची रक्कम ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे जमा करू शकता. ऑनलाइन गुंतवणूक करण्यासाठी सर्वप्रथम ईएनपीएसच्या (eNPS) अधिकृत संकेतस्थळावर जावं लागेल. त्यानंतर 'Contribution' सेक्शनमध्ये जाऊन Contribution Online वर क्लिक करा. त्यानंतर NPS खातं क्रमांक, PRAN क्रमांक, जन्मतारीख अशी आवश्यक माहिती भरा. ओटीपी व्हेरिफिकेशनसाठी एसएमएस किंवा ईमेल पर्याय निवडा. टियर १ किंवा टियर २ खाती निवडा आणि रक्कम एन्टर करा. पसंतीच्या पेमेंट गेटवेसह पेमेंट करा आणि प्रक्रिया पूर्ण करा.