Join us  

पत्नी, मुलगी किंवा आईच्या नावानेही करता येते गुंतवणूक; २ वर्षात केवळ व्याजातूनच मिळतील ३२,०००

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 9:45 AM

Post Office Scheme : या पोस्ट ऑफिस योजनेत जास्तीत जास्त २ वर्षांसाठी गुंतवणूक केली जाते. यावर महिलांना आकर्षक व्याजदराचा लाभ दिला जातो. तुम्ही या योजनेत तुमची पत्नी, मुलगी किंवा आईच्या नावानेही गुंतवणूक करू शकता.

Post Office Scheme : देशातील ९० टक्क्यांपेक्षा जास्त महिला भविष्यातील आर्थिक नियोजन करत नाही असं नुकतेच एका अभ्यासातून समोर आलं आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत असते. तुम्ही स्वतः महिला असाल किंवा तुमच्या कुटुंबातील महिलांसाठी तुम्ही काही योनजांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचवली पाहिजे. म्हणजे महिलांचे आर्थिक भविष्य सुरक्षित व्हायल मदत होईल. अशीच एक योजना म्हणजे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (Mahila Samman Savings Certificate). ही एक मुदत ठेव योजना आहे. जी विशेषतः महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेवर ७.५ टक्के दराने व्याज दिले जाते.

या योजनेचा कालावधी २ वर्षांचा आहे. म्हणजे जास्तीत जास्त २ वर्षांसाठी या योजनेत पैसे जमा करता येतात. तुम्ही तुमची पत्नी, मुलगी किंवा आई यांनाही या योजनेची माहिती देऊ शकता. यातून त्यांना चांगल्या व्याजदराचा लाभ मिळेले. पण लक्षात ठेवा की या योजनेत गुंतवणूक करण्याची संधी मार्च २०२५ पर्यंतच उपलब्ध असेल.

32,000 व्याज मिळविण्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल?MSSC कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही या योजनेत घरातील महिलेच्या नावावर 2 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला ७.५% दराने ३२,०४४ रुपये व्याज मिळेल. अशा परिस्थितीत, २ वर्षानंतरची मॅच्युरिटी रक्कम २,३२,०४४ रुपये असेल. तर १,५०,००० रुपये गुंतवल्यास, तुम्हाला दोन वर्षांनी १,७४,०३३ रुपये मिळतील. यामध्ये २४ हजार ३३ रुपये फक्त व्याज म्हणून मिळतील. जर तुम्ही १ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला १ लाख १६ हजार २२ रुपये मॅच्युरिटीच्या वेळी ७.५ टक्के व्याजदराने मिळतील. ५० हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला २ वर्षात ८ हजार ११ रुपये व्याज म्हणून मिळतील. अशा प्रकारे एकूण रक्कम ५८ हजार ११ रुपये मिळतील.

कसं उघडायचे खाते?तुम्हालाही तुमच्या कुटुंबातील कोणत्याही महिलेच्या नावावर या योजनेत गुंतवणूक करायची असेल, तर त्यासाठी तिचे खाते पोस्ट ऑफिसमध्ये उघडावे लागेल. खाते उघडताना, तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रंगीत फोटो इत्यादी केवायसी कागदपत्रांची आवश्यकता असेल. या योजनेत वयाचे कोणतेही बंधन नाही, ही योजना कोणत्याही वयोगटातील मुलगी किंवा महिलेच्या नावावर गुंतविली जाऊ शकते.

एक वर्षानंतर आंशिक पैसे काढण्याची सुविधानियमांनुसार, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना २ वर्षात परिपक्व होते. परंतु, तुम्हाला १ वर्ष पूर्ण झाल्यानंतर आंशिक पैसे काढण्याची सुविधा मिळते. आवश्यक असल्यास, तुम्ही एका वर्षानंतर ४० टक्के रक्कम काढू शकता. समजा तुम्ही या योजनेत २ लाख रुपये जमा केले असतील तर एक वर्षानंतर तुम्ही ८० हजार रुपये काढू शकता. 

टॅग्स :गुंतवणूकपोस्ट ऑफिसपैसा