Join us

दर महिन्याला केवळ २१० रुपयांची करा गुंतवणूक, आयुष्यभर मिळेल ६० हजार रुपये पेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2024 10:21 AM

तुम्ही असा गुंतवणुकीचा पर्याय शोधत आहात ज्यामध्ये गुंतवणुकीची रक्कम कमी असेल आणि पेन्शन आयुष्यभर चालू राहील? तर तुम्ही या सरकारी योजनेचा विचार करू शकता.

Atal Pension Yojna: तुम्ही पेन्शन योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात का? तुम्ही असा गुंतवणुकीचा पर्याय शोधत आहात ज्यामध्ये गुंतवणुकीची रक्कम कमी असेल आणि पेन्शन आयुष्यभर चालू राहील? तुम्हीही असंघटित क्षेत्रात काम करत असाल तर तुम्ही सरकारच्या या पेन्शन योजनेत गुंतवणूक करू शकता. सरकारच्या अटल पेन्शन योजनेअंतर्गत दरवर्षी ६०,००० रुपये पेन्शन मिळणार आहे. अटल पेन्शन योजनेचे फायदे आज आपण जाणून घेऊ. 

महिन्याला ५ हजारांचं पेन्शन 

दरमहा फक्त २१० रुपये जमा करून, तुम्हाला निवृत्तीनंतर म्हणजेच ६० वर्षांनंतर दरमहा जास्तीत जास्त ५ हजार रुपये पेन्शन मिळू शकते. म्हणजेच, तुम्हाला दररोज फक्त ७ रुपये वाचवावे लागतील. या सरकारी योजनेचं नाव आहे अटल पेन्शन योजना ज्यामध्ये दरमहा हमी पेन्शन दिली जाते. सध्याच्या नियमांनुसार, ५ हजार रुपयांच्या पेन्शनसाठी १८ व्या वर्षी तुम्ही रक्कम गुंतवली तर तुम्हाला दरमहा २१० रुपये द्यावे लागतील. तुम्ही दर तीन महिन्यांनी रक्कम भरल्यास तुम्हाला ६२६ रुपये द्यावे लागतील आणि दर सहा महिन्यांनी भरल्यास तुम्हाला १,२३९ रुपये द्यावे लागतील. दरमहा १,००० रुपये पेन्शन मिळवण्यासाठी, तुम्ही वयाच्या १८ व्या वर्षी गुंतवणूक केल्यास, तुम्हाला महिन्याला ४२ रुपये द्यावे लागतील. 

अटल पेन्शन योजना 

वृद्धापकाळातील उत्पन्नाची सुरक्षितता लक्षात घेऊन सरकारनं २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात अटल पेन्शन योजना आणली आहे. या योजनेद्वारे सरकार सामान्य लोकांना, विशेषत: असंघटित क्षेत्राशी संबंधित असलेल्यांना शक्य तितकी बचत करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. ही योजना पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे (PFRDA) चालवली जाते. 

अटल पेन्शन कॅलक्युलेशन 

अटल पेन्शन योजनेअंतर्गत, ग्राहकांना दरमहा १ हजार ते ५ हजार रुपये पेन्शन मिळते. भारत सरकार किमान पेन्शन लाभाची हमी देते. केंद्र सरकार ग्राहकांच्या योगदानाच्या ५० टक्के किंवा वार्षिक १००० रुपये, यापैकी जे कमी असेल ते योगदान देते. सरकारी योगदान अशा लोकांना दिले जाते जे कोणत्याही वैधानिक सामाजिक सुरक्षा योजनेत समाविष्ट नाहीत आणि करदाते नाहीत. योजनेअंतर्गत १०००, २०००, ३०००, ४००० आणि ५००० रुपये पेन्शन उपलब्ध आहे. पेन्शनच्या रकमेवरही गुंतवणूक अवलंबून असते. तुम्ही लहान वयात या योजनेत सहभागी झाल्यास तुम्हाला अधिक फायदे मिळतात.

टॅग्स :निवृत्ती वेतनपैसा