पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (पीओएमआयएस) एकरकमी गुंतवणुकीवर दर महिन्याला वेतनासारखे उत्पन्न देते. यात गुंतवणूकदाराची मूळ रक्कम सुरक्षित राहते. ५ वर्षांनंतर पूर्ण मूळ रक्कम गुंतवणूकदारास परत मिळते. वैयक्तिक किंवा संयुक्त अशा दोन्ही प्रकारचे एमआयएस खाते उघडता येते. अनेक लोक निवृत्तीनंतर या योजनेत पैसे गुंतवून नियमित उत्पन्न मिळवतात. पोस्टाची योजना असल्यामुळे ती पूर्णत: जोखीममुक्त आहे.
३ जणांचे खाते उघडता येतेपीओएमआयएस योजनेत वैयक्तिक खात्यावर ४.५ लाख रुपयांची, तर संयुक्त खात्यावर ९ लाख रुपयांची जास्तीत जास्त गुंतवणूक करता येते. संयुक्त खात्यात ३ प्रौढ व्यक्ती सहभागी होऊ शकतात. गुंतवणूक कमाल मर्यादा मात्र ९ लाखच राहते.
वार्षिक ६.६ टक्के दराने मिळते व्याजपीओएमआयएस योजनेत वार्षिक ६.६ टक्के दराने व्याज मिळते. ९ लाख रुपये गुंतवल्यास वर्षाला ५९,४०० रुपयांचे व्याज होते. ते १२ महिन्यांत विभागल्यास महिन्याला ४,९५० रुपये होतात. वैयक्तिक खात्यातील ४.५ लाखावर मासिक व्याज २,४७५ रुपये होते.
‘पीओएमआयएस’चे मोठे लाभ
- योजना सुरू असेपर्यंत उत्पन्न येत राहते. पक्वतेनंतर मुद्दल रक्कम परत मिळते.
- योजनेत बँक एफडीच्या तुलनेत चांगला परतावा मिळतो.
- दरमहा पैसे काढले नाही, तर पोस्टातील बचत खात्यावर ही रक्कम राहील. ती मुद्दलमध्ये जमा होऊन तिच्यावरही व्याज मिळेल.
- ५ वर्षांनी त्यावेळच्या व्याजानुसार पुन्हा नवे खाते उघडता येते.
‘पीओएमआयएस’चे खाते कसे उघडायचे?
- प्रथम तुमचे पोस्टात बचत खाते असणे आवश्यक आहे.
- ओळख पडताळणीसाठी आधार कार्ड, पासपोर्ट आणि मतदान कार्ड मान्य आहे.
- २ पासपोर्ट आकाराचे फोटो, पत्त्याचा पुरावा आवश्यक. सरकारी आयडी कार्ड अथवा युटिलिटी बिल पत्त्याचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो.
- पोस्टात जाऊन फॉर्म भरावा लागेल. फॉर्म ऑनलाइन डाऊनलोडही केला जाऊ शकतो.
- फॉर्म भरताना नॉमिनीचे नाव देणे आवश्यक आहे. १ हजार रुपये रोख किंवा धनादेशाद्वारे देऊन खाते उघडता येते.