नवी दिल्ली - पोस्ट ऑफिसकडून अनेक प्रकारच्या सेव्हिंग स्कीम चालवल्या जातात. त्यातील अनेक अशा स्कीम खूप लोकप्रिय आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर कुठल्याही प्रकारची जोखीम राहत नाही. पोस्ट ऑफिसच्या सेवांवर संपूर्ण देशाचा अनेक वर्षांपासून विश्वास राहिलेला आहे. सरकारकडून समर्थित असल्याने तिच्या बचत योजना ह्या अगदी जोखिममुक्त असतात. लाखो लोक पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करणे पसंत करतात.
दरम्यान, बऱ्याच दिवसांनंतर केंद्र सरकारने स्मॉल सेव्हिंगच्या काही योजनांवरील व्याजदरात वाढ केली आहे. जर तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी काही पर्याय शोधत असाल तर पोस्ट ऑफिसची सेव्हिंग स्कीम तुमच्यासाठी उत्तम पर्यात ठरू शकते. केंद्र सरकारने दोन आणि तीन वर्षांसाठी टाइम डिपॉझिट स्कीम, सीनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम, किसान विकास पत्र आणि पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम सारख्या योजनांवर व्याजदर वाढवला आहे. या स्मॉल सेव्हिंग स्कीमवरील व्याजदरांमध्ये झालेली वाढ १ ऑक्टोबरपासून लागू झाली आहे.
पोस्ट ऑफीसच्या टाइम डिपॉझिटमध्ये आधी दोन वर्षांसाठी ५.५ टक्के व्याज दिलं जात होतं. आता यामध्ये २० बेसिस पॉईंटची वाढ केली गेली आहे. त्यानंतर व्याजदर ५.७ टक्के झाला आहे. ५.७ टक्के झाली आहे. तर तीन वर्षांच्या टाइम डिपॉझिट स्कीमवर ३० बेसिस पॉईंट व्याज वाढवण्यात आले आहे. त्याअंतर्गत आधी ५.५ टक्के दराने व्याज मिळत होते. आता हा दर ५.८ टक्के एवढा झाला आहे. २०२२-२१ च्या पहिल्या तिमाहीमध्ये या योजनांवरील व्याजदरात कपात करण्यात आली होती.
पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्कम स्कीमच्या व्याजदरामध्ये १० बेसिस पॉईंटने वाढ करण्यात आली आहे. आधी याअंतर्गत ६.६ टक्के दराने व्याज मिळत असे. आता या योजनेमध्ये ६.७ टक्के दराने व्याज मिळेल. किसान विकास पत्र स्कीमअंतर्गत १२४ महिन्यांसाठी ६.९ टक्के दराने व्याज दिले जात असे. केंद्र सरकारने आता या स्कीमवरसुद्धा व्याजदर वाढवले आहेत. आता या योजनेंतर्गत १२३ महिन्यांच्या मॅच्युरिटीवर ७ टक्के दराने व्याज मिळेल. केंद्र सरकारने पोस्ट ऑफिसच्या सीनियर सिटीझन सेव्हिंग स्कीममध्येही व्याजदरांमध्ये २० बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. आधी या योजनेंतर्गत ७.४ टक्के व्याजाच्या दराने व्याज मिळत होते. आता ते वाढून ७.६ टक्के एवढे झाले आहे.