Monthly Income Scheme : तुम्हाला दर महिन्याला चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना (मंथली इन्कम स्कीम) तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्पात लघु बचत योजना पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेची (POMIS) मर्यादा वाढवली आहे. नवीन मर्यादा सिंगल खाते धारकांसाठी ४.५ लाख रुपयांवरून ९ लाख रुपये आणि जॉइंट खातेधारकांसाठी ९ लाख रुपयांवरून १५ लाख रुपये करण्यात आली आहे. या योजनेत तुम्ही आता एका खात्यात ९ लाख रुपये आणि जॉइंट खात्यात १५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. यानंतर तुम्हाला दरमहा १० हजार रुपये मिळतील.
योजनेत फक्त एकदाच गुंतवणूक करून तुम्ही दर महिन्याला उत्पन्नाचा लाभ घेऊ शकता. कारण या योजनेत तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त व्याज मिळेल. कारण नवीन वर्षाच्या मुहूर्तावर सरकारने या योजनेच्या व्याजदरात ०.४ टक्के वाढ केली होती. त्यामुळे आता ६.७ टक्क्यांऐवजी ७.१ टक्के दराने या योजनेवर वार्षिक व्याज मिळत आहे.
जर तुम्हाला एकरकमी गुंतवणूक करून पैसे कमवायचे असतील, तर पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना दरमहा तुमच्या उत्पन्नाचा स्रोत बनू शकते. या योजनेत नव्याने पैसे जमा करणाऱ्यांचे मासिक उत्पन्न वाढेल. तुम्ही आधी आणि आताच्या नफ्यामधील फरकही तपासून पाहू शकता.
कमाईची चांगली संधी देते स्कीम
पोस्ट ऑफिसच्या लहान बचत योजनेमध्ये समाविष्ट असलेली मासिक उत्पन्न योजना (POMIS) गुंतवणूकदारांना दरमहा कमाई करण्याची संधी देते. या योजनेत तुम्ही एकरकमी पैसे गुंतवून नियमित उत्पन्न मिळवू शकता. येथे तुमची संपूर्ण गुंतवणूक सुरक्षित राहील आणि तुम्ही ५ वर्षांनंतर संपूर्ण रक्कम काढू शकता. यात सिंगल आणि जॉइंट खाती उघडण्याची सुविधा आहे. POMIS मध्ये एका खात्याद्वारे जास्तीत जास्त ९ लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. त्याच वेळी, जॉइंट खात्यात जास्तीत जास्त १५ लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात.
आता होईल इतकी कमाई
आता तुम्ही पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीमसाठी (POMIS) १५ लाख रुपये गुंतवल्यास, तुम्हाला ७.१ टक्के वार्षिक व्याजदर मिळेल. यानुसार संयुक्त खात्यातून एक वर्षाचे एकूण १,२७,८०० रुपये व्याज होते. ही रक्कम वर्षाच्या १२ महिन्यांत वितरित केली जाईल. अशाप्रकारे प्रत्येक महिन्याचे सुमारे १०,६५० रुपये व्याज होते. तर एका खात्यातून ९ लाख रुपये जमा केल्यावर मासिक व्याज ५३२६ रुपये आणि वार्षिक व्याज ६३९१२ रुपये असेल.
५ वर्षात मॅच्युरिटी
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचा मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षांचा आहे, परंतु ५ वर्षानंतर तो नवीन व्याजदरानुसार वाढविला जाऊ शकतो. या योजनेअंतर्गत तुम्हाला बँक एफडीच्या तुलनेत चांगला परतावा मिळत आहे. जर तुम्ही मासिक पैसे काढले नाहीत, तर ते तुमच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यात राहतील आणि तुम्हाला हे पैसे मूळ रकमेसह जोडून पुढील व्याज मिळत राहील.