Power of 100 Rupees: जर तुम्हाला मोठा फंड जमा करायचा असेल तर प्रत्येक वेळी मोठीच गुंतवणूक करावी लागते, असं नाही. छोटी बचत तुम्हाला लाखोंचा फंड जमा करुन देऊ शकते. परंतु गुंतवणूक नियमितता असणं आवश्यक आहे. अशा अनेक सरकारी योजना आहेत ज्यात तुम्ही फक्त १०० रुपयांमध्ये गुंतवणूक सुरू करू शकता. यापैकी एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीम (5-Year Post Office Recurring Deposit Account). पोस्ट ऑफिस आरडीवर १ जानेवारी २०२४ पासून ६.७ टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. यामध्ये चक्रवाढ पद्धतीनं व्याज मिळतं. विशेष म्हणजे पोस्ट ऑफिसमधील ठेवींवर कोणताही धोका नसतो आणि तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात.
कशी काम करेल ₹१०० ची पॉवर
पैशातून पैसे कमावण्याचे हे संपूर्ण गणित आपल्या छोट्या बचतीतूनच चालणारं आहे. समजा तुम्ही रोज १०० रुपयांची बचत करता, म्हणजेच महिन्याला तुम्ही ३००० रुपये वाचवाल. दरम्यान, आरडीच्या माध्यमातून ही गुंतवणूक लाखो रुपयांची होईल.
पोस्ट ऑफिस आरडी कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही दरमहा ३,००० रुपयांची आरडी केली तर ५ वर्षात मॅच्युरिटीवर तुम्हाला २.१४ लाख रुपये मिळतील. त्यात तुमची एकूण गुंतवणूक १,८०,००० रुपये असेल, तर व्याजातून मिळणारी रक्कम ३४,०९७ रुपये असेल. त्यात नॉमिनेशनची सुविधाही आहे. तर मॅच्युरिटीनंतर आरडी खातं आणखी ५ वर्षे चालू ठेवता येतं.
काय आहे खासियत?
पोस्ट ऑफिसमध्ये केवळ १०० रुपयांपासून तुम्ही रिकरिंग डिपॉझिटमध्ये (आरडी) गुंतवणूक सुरू करू शकता. कमीत कमी १०० रुपयांत खातं उघडल्यानंतर तुम्ही १०-१० रुपयांच्या पटीत पैसे जमा करू शकता. यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा नाही.
यामध्ये एखादी व्यक्ती अनेक खाती उघडू शकते. सिंगल व्यतिरिक्त तीन जणांना मिळून एक जॉइंट अकाऊंट उघडता येते. अल्पवयीन मुलां-मुलींसाठी त्यांचे पालक खातं उघडू शकतात. पोस्ट ऑफिसच्या आरडी खात्याची मॅच्युरिटी ५ वर्षांची असते. परंतु, प्री-मॅच्युअर क्लोजर ३ वर्षांनंतर केलं जाऊ शकतं. पोस्ट ऑफिसमधील आरडी खात्यावर १२ हप्ते जमा केल्यानंतर खात्यात जमा झालेल्या रकमेच्या ५० टक्क्यांपर्यंत कर्ज घेता येतं.