गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित गुंतवणुकीची संधी येऊ घातली आहे. केंद्र सरकारने २०२५च्या आर्थिक वर्षात दुसऱ्या सहामाहीत सार्वभौम हरित रोख्यांमधून २० हजार कोटी उभारण्याची योजना आखली आहे. ५ हजार कोटी ग्रीन बॉण्ड चार टप्प्यांमध्ये जारी करण्यात येतील, अशी माहिती अर्थ मंत्रालयाने दिली.
५ हजार कोटींचा १० वर्षांच्या मुदतीचा ग्रीन बॉण्डचा पहिला इश्यू २५ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत जारी केला जाईल. दुसरा इश्यू ३० वर्षाच्या मुदतीचा असेल. हा ९ ते १३ डिसेंबर या कालावधीत खुला केला जाईल. तिसरा इश्यू २७ ते ३१ जानेवारीदरम्यान जारी केला जाईल. हा १० वर्षांच्या मुदतीसाठी असेल. चौथा इश्यू ३० वर्षांच्या मुदतीचा असेल. तो १७ ते २१ फेब्रुवारी या काळात खुला करण्यात येईल.
गुंतवणूकदारांना फायदा काय?
या रोख्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना निश्चित स्वरुपाचा व्याजलाभ मिळतो आणि ठरलेल्या मुदतीनंतर गुंतलेले सर्व पैसे परत केले जातात. सरकारचे पाठबळ असल्याने पैशांच्या सुरक्षिततेबाबत संपूर्ण खात्री बाळगता येईल. २०२८ आणि २०३३ सालात तमुदतपूर्ण मुदत पूर्ण पूर्ण होत असलेल्या पाच आणि १० वर्षे मुदतीच्या हरित रोख्यांवर गुंतवणूकदारांना अनुक्रमे ७.३८% व ७.३५% या दराने परताव्याची हमी दिली गेली आहे.
काय आहे ग्रीन बॉण्ड?
बॉण्ड अथवा रोखे हे असे माध्यम आहे ज्याद्वारे तुलनेने स्वस्त दरात कर्ज उभारता येते. रोख्यांच्या विक्रीच्या या प्रक्रियेचे व्यवस्थापन रिझर्व्ह बँकेकडून पाहिले जाते. बँका, वित्त संस्था ते सामान्य लोकांनादेखील हे रोखे जारी केले जाऊ शकतात.
या निधीतून कार्बन उत्सर्जन किमानतम असणाऱ्या पर्यावरणानुकूल प्रकल्पांना अर्थसाह्य केले जाईल, प्रामुख्याने सौर वीजनिर्मिती प्रकल्पांसाठी तो वापरला जाईल.