Join us  

Investment Tips: दररोज वाचवा इतके पैसे, ५ वर्षांत घ्याल १० लाखांची SUV; समजून घ्या गणित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 8:09 PM

कमाई सोबत बचत करणं खूप महत्वाचं आहे. तुमचं उत्पन्न जास्त नसलं तरी तुम्ही फार कमी वेळात मजबूत बँक बॅलन्स जमा करू शकता.

कमाई सोबत बचत करणं खूप महत्वाचं आहे. तुमचं उत्पन्न जास्त नसलं तरी तुम्ही फार कमी वेळात मजबूत बँक बॅलन्स जमा करू शकता. यासाठी तुम्हाला तुमची बचत योग्य ठिकाणी गुंतवावी लागेल. तुमच्या बचतीवर तुम्हाला बंपर परतावा मिळू शकतो. तुम्हाला चांगला परतावा हवा असेल तर म्युच्युअल फंडातील SIP हा चांगला पर्याय आहे. याद्वारे, नियमित गुंतवणुकीसह, तुम्ही दीर्घ मुदतीसाठी भरीव निधी जमा करू शकता. तुम्ही एसआयपीमध्ये गुंतवणुकीसाठी थोड्या रकमेपासून सुरुवात करू शकता. तुम्ही १०० रुपयांच्या गुंतवणुकीनंही सुरुवात करू शकता. एसआयपीबाबत गेल्या काही काळापासून गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतोय.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका पद्धतीबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही केवळ ५ वर्षांत १२ लाख रुपयांचा भरीव निधी जमा करू शकता. एसआयपीमध्ये कंपाउंडिंगचा चांगला फायदा मिळतो. तुम्ही दीर्घ मुदतीसाठी एसआयपीमध्ये गुंतवणूक केल्यास हा एक चांगला पर्याय ठरू शकेल.

असा करा १० लाखांचा फंडजर तुम्हाला १० लाख रुपयांचा फंड जमा करायचा असेल तर तुम्हाला दररोज ४०० रुपये वाचवावे लागतील. तुम्हाला हे ५ वर्षे करावे लागेल. जर तुम्ही दररोज ४०० रुपयांची बचत केली तर तुमची एका महिन्यात सुमारे १२ हजार रुपयांची बचत होईल. समजा तुम्हाला एसआयपीवर सुमारे १५ टक्के वार्षिक परतावा मिळत असेल तर तुम्ही पुढील ५ वर्षांसाठी दरमहा १२ हजारांची SIP ठेवल्यास, तुमच्याकडे सुमारे १० लाख रुपयांचा निधी जमा होईल. असे अनेक फंड आहेत ज्यांनी १५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे.

जर तुम्ही वयाच्या २५ व्या वर्षापासून एसआयपीमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुम्ही वयाच्या ३० व्या वर्षी १० ते १२ लाख रुपयांचा निधी सहज जमा करू शकता. एसआयपी ही गुंतवणुकीची चांगली पद्धत आहे. मात्र, यामध्ये परताव्याची हमी नसते आणि धोकाही असतो. 

(टीप - कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

टॅग्स :गुंतवणूकपैसा