Investment Tips : आजच्या घडीला बाजारात गुंतवणुकीचे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये आपल्यासाठी कोणता पर्याय चांगला याची निवड करताना अनेकदा गोंधळ उडतो. जर तुम्ही गुंतवणुकीची योजना आखत असाल आणि तुमच्यासाठी इक्विटी, सोने किंवा PPF यापैकी कुठे पैसे गुंतवू हे समजत नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. काही गुंतवणूक पर्याय जास्त परतावा देतात. पण, त्यामध्ये जोखीम देखील जास्त असते. काही सुरक्षित आहेत, पण परताव्यासाठी दीर्घकाळ वाट पाहावी लागते. या कारणांमुळे कोणताही एक मालमत्ता वर्ग निवडणे कठीण होते. पैसे कोठे गुंतवायचे हे तुमची जोखीम क्षमता, आर्थिक गरजा आणि गुंतवणुकीचा कालावधी यावर अवलंबून आहे.
जर तुमचे लक्ष्य दीर्घकालीन गुंतवणुकीतून जास्त परतावा कमवायचे असेल तर तुमच्यासाठी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे हा उत्तम पर्याय असू शकतो. यामध्ये एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करून तुम्ही त्याचे शेअरहोल्डर बनता आणि कंपनीच्या वाढीबरोबर तुमच्या शेअर्सची किंमतही वाढू शकते.
फायदे आणि तोटे
इक्विटीमध्ये उच्च परतावा देण्याची क्षमता असून तरलता चांगली आहे, म्हणजेच तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही शेअर्स खरेदी किंवा विक्री करू शकता. वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ तयार करून जोखीम कमी करता येते. इक्विटीचा तोटा म्हणजे बाजारातील चढउताराचा थेट परिणाम तुमच्या गुंतवणुकीवर होतो, त्यामुळे तोटा होण्याची शक्यता असते. अनुभवी गुंतवणूकदारांसाठी हा पर्याय नेहमीच फायद्याचा ठरू शकतो. परंतु, नवीन गुंतवणूकदारांना योग्य स्टॉक निवडण्यात अडचण येऊ शकते.
सोने : सुरक्षित गुंतवणूक पण..
सोने ही नेहमीच सुरक्षित गुंतवणूक मानली जाते, कारण त्याचे मूल्य सामान्यतः स्थिर राहते. आज, भौतिक सोन्याव्यतिरिक्त, सॉवरेन गोल्ड बॉन्ड (SGB), गोल्ड ईटीएफ आणि डिजिटल गोल्ड सारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, ज्याद्वारे कोणीही प्रत्यक्ष सोने खरेदी न करताही त्यात गुंतवणूक करू शकतो. जगात कोणतेही संकट आले की सोन्याची किंमत वाढते. सोन्यात तरलता आहे. यामुळे पोर्टफोलिओमध्ये स्थिरता राखण्यास मदत होते. याचा मोठा तोटा म्हणजे सोन्याची विक्री होईपर्यंत गुंतवणुकीतून कोणतेही उत्पन्न मिळत नाही. सोन्याच्या किमतीही काही वेळा झपाट्याने बदलतात.
PPF : निश्चित परतावा आणि कर लाभ
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) ही एक सरकारी बचत योजना आहे. यामध्ये निश्चित परतावा आणि कर लाभ दोन्ही फायदे मिळतात. ज्यांनी जोखीम न घेता दीर्घ मुदतीसाठी सुरक्षित गुंतवणूक करायची असेल त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. यात सरकारकडून दरवर्षी व्याजदर जाहीर केला जातो. यामध्ये गुंतवलेली रक्कम आणि व्याज दोन्ही करमुक्त आहेत.
पीपीएफचा लॉक-इन कालावधी १५ वर्षे आहे, जो काही गुंतवणूकदारांसाठी समस्या असू शकतो. यामध्ये तरलता कमी आहे, म्हणजे गरज पडल्यावर लगेच पैसे काढणे कठीण होऊ शकते.
तुमच्यासाठी कोणता पर्याय योग्य असेल?
जर तुम्हाला उच्च परतावा आणि दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करायची असेल आणि जोखीम घेण्याची तयारी असेल तर शेअर मार्केट तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक हवी असेल आणि तुमच्या पोर्टफोलिओमध्ये स्थिरता आणायची असेल, तर सोने हा एक चांगला पर्याय असू शकतो. जर तुम्हाला निश्चित परतावा आणि कर बचत हवी असेल तर पीपीएफ सर्वोत्तम असेल.