Join us

Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 12:55 PM

Investment Tips : आर्थिक नियोजन केले नसेल तर निवृत्तीनंतर तुम्हाला हलाखीच्या दिवसांचा सामना करावा लागू शकतो. जाणून घ्या कोणत्या गुंतवणूकीच्या पर्यायांचा तुम्ही करू शकता विचार.

Investment Tips : आर्थिक नियोजन केले नसेल तर निवृत्तीनंतर तुम्हाला हलाखीच्या दिवसांचा सामना करावा लागू शकतो. अचानक येणारी संकटे, गंभीर आजारपण किंवा मोठा अपघात यामुळे मोठ्या रकमेची गरज भासू शकते. वयाच्या या टप्प्यावर कुणाही आर्थिक मदत करण्यासाठी तयार होत नाही. अशावेळी तुमच्या हाताशी अजिबात रक्कम शिल्लक नसेल तर तुमच्यासह परिवाराचीही तारांबळ उडू शकते. त्यामुळे निवृत्तीनंतरच्या हालअपेष्टा टाळण्यासाठी पैशांची तजविज करताना योग्य पर्यायांचा वेळीच अवलंब केला पाहिजे. 

ज्येष्ठ नागरिक बचत खाते  

पोस्टाच्या ही योजना बचतीवर दरवर्षाला ८.२ टक्के व्याज देते. यात कमीत कमी एक हजार रुपये तर जास्तीत जास्त ३० लाख जमा करता येतात. जमा रकमेवर पाच वर्षांनी दरमहा प्याज दिले जाते. या बचतीवर आयकर अधिनियम ८० सी अंतर्गत दीड लाखांपर्यंत सूटही दिली जाते. 

अटल पेंशन योजना 

ही योजना सरकारने ज्येष्ठ नागरिकांचे हित समोर ठेवून सुरु केली आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यानंतर १००० ते ५००० रुपयांपर्यंत पेंशन दरमहा दिली जाते. १८ ते ४० या वयोगटातील नागरिक वासाठी अर्ज करु शकतात. 

मासिक उत्पन्न योजना  

ही योजना पोस्टाद्वारे चालविली जाते. या योजनेत एकदा केलेल्या बचतीतून लाभधारकाला पाच वर्षे पेंशन दिले जाते. तसेच वार्षिक ७.४% दराने व्याज दिले जाते. एका व्यक्तीला जास्तीत जास्त ९ लाख रुपये तर जोडप्याला १५ लाख गुंतविता येतात. व्यक्तीला दरमहा जास्तीत जास्त ५,५५० रुपये तर जोडप्याला जास्तीत जास्त ९,२५० रुपयांची पेंशन दरमहा दिली जाते. 

सिस्टिमॅटिक विड्रॉवल प्लान  

म्युच्युअल फंडात या प्लानद्वारे गुंतवणूक करता येते. हे पैसे शेअर बाजारातील रोख्यांमध्ये गुंतविले जात असतात. या फंडातून संबंधित व्यक्तीला मासिक पेंशन दिले जाते. शेअर बाजार घसरल्यास केलेली बचत कमी होण्याचा धोका असतो. त्यामुळे जाणकारांच्या सल्ल्यानुसार ही गुंतवणूक केली पाहिजे. 

मुदत ठेव योजना  

पोस्ट खात्यात तुम्हाला बचत केलेली रक्कम विशिष्ट मुदतीसाठी ठेवता येते. बहुतेक सर्वच बँका या स्वरुपाच्या ठेवी स्वीकारत असतात. यावर मासिक, तिमाही, सहामाही तसेच वार्षिक तत्त्वावर खातेधारकाला व्याजही दिले जात असते. ज्येष्ठ नागरिकांसाठी ०.२५ टक्के अधिक व्याज दिले जाते. 

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूकज्येष्ठ नागरिकपैसा