Investment Tips : गुंतवणूक ही काळाची गरज आहे. भविष्याचा विचार करून गुंतवणूक करणं आवश्यक आहे. बाजारातील गुंतवणूकीवर अधिक परतावा मिळत असला तरी त्यातील जोखीम लक्षात घेता आजही अनेक जण बँकांमधील एफडी किंवा अन्य स्कीम्समध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात. कारण तेथील गुंतवणूक ही सुरक्षित असते.
एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आता अधिक परतावा मिळणार आहे. काही बँकांनी एफडीवरील व्याजदरात बदल केला आहे. या बदलांनंतर वार्षिक व्याजदर ८ टक्क्यांहून अधिक झाला आहे. यामध्ये पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध आणि बँक ऑफ बडोदा या तीन बँकांचा समावेश आहे. जर तुम्ही जास्त व्याजदराच्या एफडीच्या शोधात असाल तर तुम्ही या बँकांमध्ये एफडी करू शकता. नवे व्याजदर लागूही झाले आहेत.
अलीकडच्या काळात एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याचं कारण म्हणजे एफडीमध्ये गुंतवणूक करताना बाजारातील चढ-उतारांचा धोका नसतो. गुंतवणूकदारांना निश्चित परतावा मिळतो. इतर अनेक योजनांच्या तुलनेत व्याजदर कमी असूनही अनेकांना त्यात गुंतवणूक करायला आवडते.
पंजाब नॅशनल बँक
पंजाब नॅशनल बँक सर्वसामान्यांना ७ दिवस ते १० वर्षांच्या एफडीवर ३.५०% ते ७.२५% पर्यंत व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकेचा व्याजदर ४ ते ७.७५ टक्के आणि अतिज्येष्ठ नागरिकांसाठी ४.३० ते ८.०५ टक्के आहे. याशिवाय बँक ४०० दिवसांच्या मुदतीवर ७.२५%, ७.७५% आणि ८.०५% व्याज दर देत आहे.
पंजाब अँड सिंध बँक
ही बँक सर्वसामान्यांसाठी ७ दिवस ते १० वर्षांच्या कालावधीसाठी २.८०% ते ७.२५% दरम्यान व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना तीन कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवर ०.५० टक्के अतिरिक्त व्याज मिळत आहे. अति ज्येष्ठ नागरिकांना स्पेशल एफडी (२२२ दिवस, ३३३ दिवस, ४४४ दिवस, ६६६ दिवस, ९९९ दिवस) वर ०.१५% अतिरिक्त व्याज दिले जात आहे.
बँक ऑफ बडोदा
ही बँक गुंतवणूकदारांना एफडीवर आकर्षक व्याजदरही देत आहे. सर्वसामान्य नागरिकांना ७ दिवस ते १० वर्षांच्या कालावधीवर ४.२५% ते ७.१५% दरम्यान व्याज दर मिळत आहे. बँक ज्येष्ठ नागरिकांना ४.७५ ते ७.६० टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. ऑफर्स. त्याचबरोबर अतिज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याजदर दिला जात आहे.