Rent or Buy a Home : घर खरेदी करावे की भाड्याने राहावे, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. याचे उत्तर तुमच्या आर्थिक परिस्थितीवर, गरजांवर आणि भविष्यातील योजनांवर अवलंबून असते. दोन्ही पर्यायांचे फायदे आणि तोटे आहेत, ज्यांचा तुम्ही काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. मालमत्तेच्या किमतीत झपाट्याने वाढत असल्यामुळे घर खरेदी करणे नेहमीच व्यावहारिक नसते. त्याच वेळी, तुम्ही भाड्याने राहता तेव्हा, तुलनेने परवडणाऱ्या भाड्यात तुम्हाला चांगले, अधिक प्रशस्त आणि सुविधांनी परिपूर्ण निवासस्थान मिळू शकते. भाड्याने घर घ्यावं की खरेदी करावे असा गोंधळ तुमच्या मनात असेल तर आज आम्ही भाड्याने घरात राहण्याचे फायदे सांगणार आहोत. यानंतर तुम्हाला निर्णय घेण्यास मदत होऊ शकते.
देखभाल खर्च कमी
जेव्हा तुम्ही भाड्याच्या घरात राहता, तेव्हा तुम्हाला मिळणारा पहिला फायदा म्हणजे तुम्हाला खूप कमी देखभाल खर्च द्यावा लागतो. उदाहरणार्थ, भाडेकरू म्हणून तुम्हाला घराच्या मूलभूत देखभालीसाठी काही शुल्क भरावे लागते. पण, तुम्हाला मोठ्या दुरुस्ती किंवा नुकसानीबद्दल टेन्शन घेण्याची गरज नाही. ही जबाबदारी त्या घराच्या मालकाची असते. घरमालकाला स्वतःच्या खिशातून दुरुस्ती किंवा देखभालीसाठी खर्च करावा लागू शकतो.
हवे तिथे राहण्याचे स्वातंत्र्य
भाड्याच्या घरात राहण्याचा एक मोठा फायदा म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीच्या ठिकाणी हवे तेव्हा घर बदलू शकता. हे तुम्हाला घर घेण्यापेक्षा अधिक लवचिकता देते. जे लोक वारंवार नोकरी बदलतात त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे. सर्व भाडेकरूंना घर रिकामे करण्यापूर्वी एक महिन्याची नोटीस देणे आवश्यक आहे. याउलट भाडेकरू हवे तेव्हा घर सोडू शकतो.
भाड्यावर कर सवलतीचा लाभ
तुम्ही भाड्याच्या घरात राहून आर्थिक लाभ देखील घेऊ शकता. तुम्ही घरभाडे भत्ता म्हणजेच HRA चा दावा करू शकता. भाडेकरू मेट्रो शहरांमध्ये त्यांच्या मूळ पगाराच्या सुमारे ५० टक्के आणि टियर II किंवा टियर III शहरांमध्ये ४० टक्क्यांपर्यंत दावा करू शकतात. याउलट घरमालकांना मालमत्तेच्या जागेनुसार वार्षिक मालमत्ता कर भरावा लागतो.
अधिक सुविधा मिळतात
भाड्याने राहण्याचा आणखी एक आर्थिक फायदा म्हणजे तुम्हाला अशा सुविधा मिळतात, ज्यासाठी तुम्हाला बरेच पैसे मोजावे लागतात. स्विमिंग पूल, जिम किंवा स्पोर्ट्स कोर्ट यासारख्या सुविधा सामान्यतः मध्यम ते उच्च स्तरावरील निवासी सोसायट्यांमध्ये उपलब्ध असतात. घरमालकाने भरलेल्या शुल्कात तुम्हाला या सुविधा विनामूल्य मिळतात.
वाचा - कागदपत्रांशिवाय पीएफमधून काढता येणार ५ लाख रुपये; 'या' कारणांसाठी मिळणार ऑटो क्लेमची सुविधा
कुठलीही मोठी गुंतवणूक नाही
मालमत्ता खरेदी करताना, कर्ज घेण्यापूर्वी मालकाला मोठ्या प्रमाणात डाउन पेमेंट करावे लागते. त्यानंतर, मालमत्तेचा प्रकार किंवा जीवनशैलीनुसार घराची अंतर्गत सजावट, फर्निचर इत्यादींवर अधिक खर्च करावा लागतो. मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क यांसारखे मालमत्ता कर थेट मालकाच्या खिशातून भरले जातात. तर भाडेकरूला या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी आगाऊ कोणतीही गुंतवणूक करण्याची गरज नाही. भाडेकरला फक्त जमानत भरावी लागते, तीही घर सोडताना तुम्हाला परत मिळते.