Join us  

म्युच्युअल फंड खरेच सही है? प्रश्न आहे विश्वासाचा!

By पुष्कर कुलकर्णी | Published: June 30, 2024 11:33 AM

मुद्द्याची गोष्ट :  सेबी म्हणजेच सेक्युरिटी एक्ससेंज बोर्ड ऑफ इंडियाने नुकतेच क्वान्ट म्युच्युअल फंडच्या दोन कार्यालयात फ्रंट रनिंगच्या संदर्भात चौकशी सुरु केली. यामुळे म्युच्युअल फंड्स आणि त्यांची एकूणच कार्यपद्धती यावर गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. म्युच्युअल फंड्स मधील गुंतवणूक खरोखरच सही है ना? असे प्रश्न गुंतवणूकदार एकमेकांना विचारू लागले.

डॉ. पुष्कर कुलकर्णी गुंतवणूक विश्लेषक

भारतात म्युच्युअल फंड्स मधील गुंतवणूक मालमत्ता व्यवस्थापन पन्नास लाख कोटींच्या वर पोचली आहे. १९९० दरम्यान म्युच्युअल फंड्स मधील गुंतवणूक भारतात सुरु झाली. सुरवातीस हा प्रकार नेमका काय आहे हे गुंतवणूकदारांना समजत नव्हते. हळू हळू समजू लागले. खासगी वित्तीय संस्था यात वाढू लागल्या. गुंतवणूकदार वाढू लागले. खऱ्या अर्थाने गेल्या दहा वर्षांत भारतात म्युच्युअल फंड्सने जोर धरला. चार कोटी खाती ते तब्बल १८ कोटी खाती अशी साडेचार पटीने गुंतवणूदार वाढले. एकरकमी ते महिनावार एसआयपी अशी गुंतवणूक पद्धत सुरु झाली. गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड्स मधील गुंतवणुकीतून बँक आणि पोस्ट एफडीतून जितका व्याजाचा परतावा मिळतो त्या पेक्षा जास्त परतावा मिळू लागला. यामुळे स्वाभाविकच अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंड्स गुंतवणुकीकडे वळले आणि तो ओघ अजून सुरु आहे.

क्वान्ट म्युचुअल फंड मधील फ्रंट रनिंग प्रकार म्हणजे नेमके काय?जी माहिती आम जनतेस मिळण्याआधी त्या माहितीच्या आधारे इक्विटी शेअर्स मधील गुंतवणूक खरेदी करणे किव्वा विक्री करणे, त्या संदर्भात फ्युचर आणि ऑप्शन मधील व्यवहार करणे आणि प्रत्यक्ष माहिती आम जनतेसमोर आली की त्यातील प्रत्यक्ष फायदा काढून घेण्यासाठी पुन्हा व्यवहार करणे याला फ्रंट रनिंग असे म्हणतात. कायद्याने यास संमती नाही. क्वान्ट म्युचअल फंड्स मधील फंड्स व्यवस्थापनाने फ्रंट रनींग चा वापर करून अधिक फायदा मिळवीत गुंतवणूकदारांना अधिक परतावा दिल्याचा संशय आल्याने सेबी ने त्याची चौकशी त्यांच्याच कार्यालयात जाऊन करण्याचे ठरवले. ही बातमी जशी बाहेर आली तसे सोशल मीडिया वर गुंतवणूकर अस्थिर झाले. आता आपली गुंतवणूक बुडणार का? पुढे नेमके काय होणार? अशा चर्चा सुरु झाल्या.

सेबी कशासाठी?सन  १९८८ पूर्वी सामान्य गुंतवणूकदारांना अनेक प्रकारे फसविले जायचे. यासाठीच  सिक्युरिटीज ऍण्ड एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडिया ची स्थापना एप्रिल १९८८ साली झाली. सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे हित सांभाळणे हा मुख्य उद्देश या संस्थेचा आहे. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड्स आस्थापना सेबी च्या कडक नियमात चालतात. गुंतवणूकदारांची गुंतवणूक सुरक्षित राहावी यासाठी नियमावली तयार झाली आणि त्याचे पालन सर्व संस्थांना करावे लागते.

‘क्वान्ट’मुळे म्युच्युअल फंड्सची विश्वासार्हता कमी होणार का? - म्युचअल फंड्स चालविणाऱ्या अनेक संस्था गेली अनेक वर्षे भारतात कार्यरत आहेत. सर्वांचे मिळून एकत्रित मालमत्ता व्यवस्थापन ५० लाख कोटींच्या घरात आहे. क्वान्ट कडे जी गुंतवणूक झाली आहे त्यांचे एकत्रित मूल्य सध्या ८८ हजार कोटी रुपये आहे. म्हणजेच एकूण दोन टक्क्यांपेक्षा कमी. - आता सेबीने त्यांच्या दोन कार्यालयात चौकशी सुरु केली आहे. क्वान्ट म्युच्युअल फंड व्यवस्थापनाद्वारे सर्व गुंतवणूकदारांना ईमेल द्वारे एक परिपत्रक पाठवून आपली बाजू मांडली असून गुंतवणूकदारांनी गैरसमज न करून घेता गोंधळून जाऊ नये आणि संस्थेवर विश्वास कायम ठेवावा असे आवाहन आहे.- सेबी तर्फे गुंतवणुकीच्या हितार्थ जी चौकशी होईल त्यास संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. गुंतवणूकदारांच्या हिताचे तसेच म्युचुअल फंड्स मधील गुंतवणुकीत सेबीच्या नियमावलीत राहून गुंतवणूकदारांना योग्य परतावा देत राहू असे कंपनीचे म्हणणे आहे. 

प्रश्न आहे विश्वासाचास्पर्धेच्या या युगात म्युचुअल फंड्स चालविणाऱ्या आस्थापनांनी बघा मीच अधिक रिटर्न्स कसे देतो हे दाखवण्याच्या नादात कोणतेही नियम पायदळी तुडवू नयेत ही माफक आणि रास्त अपेक्षा गुंतवणूकदारांनी जर ठेवली तर त्यात वावगे असे काहीच नाही. अजून क्वान्ट ची चौकशी होऊन त्यातील तथ्य बाहेर येणे बाकी आहे. गुंतवणूकदारांनी त्याची वाट पाहावी. 

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक