Tata Motors New Plant for JLR: तुमच्यापैकी अनेकांना माहित असेल की, जग्वार आणि लँड रोव्हर कार टाटा मोटर्स बनवते. पण, या गाड्यांचे उत्पादन भारतात होत नाही. पण, आता लवकरच भारतात जग्वार लँड रोव्हर गाड्यांचे उत्पादन सुरू होणार आहे. टाट मोटर्स तामिळनाडूमध्ये एक नवीन प्लांट उभारत आहे, ज्यात जग्वार आणि लँड रोव्हर कारचे उत्पादन केले जाईल. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, टाटा मोटर्स यासाठी $1 अब्ज गुंतवणूक करणार आहे.
टाटा मोटर्स आणि JLR टायअप
या नवीन प्लांटमुळे टाटा मोटर्स आणि जेएलआर यांच्यातील भागीदारी आणखी वाढणार आहे. दोन्ही कंपन्यांनी एकत्र सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्यादेखील केल्या आहेत. या सामंजस्य करारावर JLR च्या इलेक्ट्रीफाईड मॉड्युलर आर्किटेक्चर (EMA) प्लॅटफॉर्मसाठी स्वाक्षरी करण्यात आली आहे. या प्लॅटफॉर्मचा वापर टाटाच्या आगामी इलेक्ट्रिक वाहनांसाठी केला जाईल. या प्लॅटफॉर्मचे पहिले मॉडेल 2024 च्या अखेरीस बाजारात येऊ शकते.
JLR चे EMA प्लॅटफॉर्म
JLR च्या EMA प्लॅटफॉर्मची माहिती 2021 मध्ये शेअर करण्यात आली होती. हे प्लॅटफॉर्म नेक्स्ट जनरेशन वेलार, इव्होक आणि डिस्कव्हरी स्पोर्टमध्ये पाहता येईल. JLR च्या मते, हे प्लॅटफॉर्म प्रगत ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम, विस्तृत क्लाउड कनेक्टिव्हिटी आणि इतर गाड्यांशी कम्युनिकेशन करण्यासाठी आणले आहे. जेएलआरच्या या गाड्यांमध्ये अल्ट्राफास्ट चार्जिंग तंत्रज्ञानावरही भर दिला जात आहे.
भारतात जग्वार लँड रोव्हरला मागणी
जग्वार लँड रोव्हरची वाहने भारतात मोठ्या प्रमाणावर विकली जातात. 2023-24 या आर्थिक वर्षात या गाड्यांच्या विक्रीत 81 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीने FY24 मध्ये भारतात 4,436 युनिट्सची विक्री केली. जग्वार लँड रोव्हरने 2009 मध्ये भारतात प्रवेश केल्यापासून विक्रीच्या दृष्टीने कंपनीची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.