PPF News: चालू आर्थिक वर्ष, २०२४-२५ साठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) खात्यात गुंतवणूक करणाऱ्या लोकांना त्यांचे पैसे ५ एप्रिलपूर्वी खात्यात जमा केले जातील याची खात्री करावी लागेल. तसं न केल्यास त्यांना लाखोंचे नुकसान होऊ शकतं. कारण ५ एप्रिलपूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा पीपीएफ खातेधारकांना अधिक फायदा होऊ शकतो.
पीपीएफ योजनेनुसार, पीपीएफ खात्यातील व्याज दर महिन्याच्या ५ तारखेपासून ते महिन्याच्या अखेरीस पीपीएफ खात्यातील सर्वात कमी शिल्लकीच्या आधारावर मोजलं जातं. त्यामुळे पीपीएफमध्ये गुंतवणूक करणारे लोक आर्थिक वर्षासाठी एकरकमी पेमेंट करत असतील तर कमाई वाढवण्यासाठी ते ५ एप्रिलपूर्वी केले पाहिजे.
जे वर्षातून एकदा मोठी एकरकमी रक्कम जमा करतात त्यांच्यासाठी हे अधिक महत्त्वाचं आहे. यामध्ये कोणत्याही विलंबामुळे वार्षिक ठेवीवरील संपूर्ण महिन्याचं व्याज गमवावं लागू शकतं. जे त्यांच्या पीपीएफ खात्यांमध्ये मासिक पेमेंट करतात त्यांच्यासाठी, व्याजाचं कोणतंही नुकसान होणार नाही, याची खात्री करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला किंवा त्यापूर्वी मासिक योगदान दिलं पाहिजे.
थोडा उशिर करेल मोठं नुकसान
पीपीएफमध्ये रक्कम डिपॉझिट करताना थोडासा विलंब तुम्हाला लाखोंचं नुकसान पोहोचवू शकतं. ५ एप्रिल किंवा दर महिन्याच्या ५ तारखेपूर्वी केलेल्या पीपीएफ डिपॉझिट्सवर त्या तारखेनंतर केलेल्या पीपीएफ ठेवींपेक्षा जास्त व्याज मिळतं.
लक्षात ठेवा की पीपीएफ खात्यातील व्याजाची गणना मासिक आधारावर केली जाते परंतु ते आर्थिक वर्षाच्या अखेरिस जमा केलं जातं. याशिवाय पीपीएफ खात्यावरील व्याजाची सरकारकडून दर तीन महिन्यांनी समीक्षा केली जाते.
उदाहरणानं समूजन घ्या
पीपीएफ एप्रिल-जून २०२४ या तिमाहीसाठी वार्षिक ७.१ टक्के व्याज देते. पीपीएफ खात्याच्या १५ वर्षांच्या कालावधीसाठी हाच व्याजदर आहे असं गृहीत धरून. एखाद्या व्यक्तीला पुढील १५ वर्षे ५ एप्रिल किंवा त्यापूर्वी दरवर्षी १.५ लाख रुपये जमा करून १८.१८ लाख रुपयांचे व्याज मिळेल.
त्याच वेळी, पीपीएफ खातेधारकानं ५ एप्रिलनंतर पैसे जमा केल्यास, त्याला फक्त १५.८४ लाख रुपयांचं व्याज मिळतील. त्यामुळे, ५ एप्रिलनंतर एकरकमी रक्कम गुंतवल्यास, पीपीएफ खातेधारकाला १५ वर्षांच्या कालावधीत २.६९ लाख रुपयांचं नुकसान सहन करावं लागेल.