Join us  

शेअर बाजारातील चढ-उतारादरम्यान जाणून घ्या गुंतवणूकीचे गोल्डन रुल, फायद्यात राहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 11:44 AM

इक्विटीचा गोल्डन रुल म्हणजे तुमचं असेल अलोकेशन निश्चित करा आणि दैनंदिन किमतीच्या हालचालींवर जास्त लक्ष न देता तुमच्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टांवर कायम राहा.

इक्विटी मार्केट (Equity Market) ही गुंतवणुकीसाठी एक उत्तम जागा आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीच्या बाबतीत इक्विटी (Equity) ही सर्वोत्तम कामगिरी करणारी मालमत्ता आहे आणि गुंतवणूकदारांना बँक ठेवींच्या तुलनेत दुप्पट परतावाही दिला आहे. परंतु जर आपण बाजार नियामक सेबीच्या नुकत्याच केलेल्या अभ्यासावर नजर टाकली तर हे समजून येतं की इक्विटी मार्केटमध्ये ८५ टक्क्यांपेक्षा अधिक ट्रेडर्सचे पैसे बुडाले आहेत, याचाच अर्थ त्यांना मोठं नुकसान सोसावं लागलं आहे. हा विरोधाभास नाही का? शेवटी, गुंतवणूकदारांना नफा मिळवून देण्यासाठी इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे?ॉ

बडोदा बीएनपी पारिबा म्युच्युअल फंडाचे सीईओ सुरेश सोनी यांच्या मते गुंतणूकदारांच्या मनात ही गुंतवणूकीची योग्य वेळ आहे का? असा सामान्य प्रश्न असतो. तुम्ही बातम्या वाचून आज इक्विटी खरेदी करायची की उद्या विकायची हे ठरवू शकत नाही. यापेक्षा तुम्ही किती कालावधीपर्यंत बाजारात गुंतवणूक कायम ठेवण्यासाठी तयार आहात हा प्रश्न विचारला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

किती जोखीम पत्करू शकता?तुम्ही बाजारात किती जोखीम पत्करू शकता, इथूनच तुमचा प्रवास सुरू होतो. जर पुढील सहा महिन्यांसाठी तुम्हाला इमर्जन्सी फंडाची गरज भासणार असेल तर तेव्हा या सहा महिन्यांत इक्विटी फंडापासून दूरच राहा. परंतु तुमच्या गुंतवणूकीचं लक्ष्य दीर्घकालावधीचं असेल तर याकडे तुम्ही पाहू शकता. याचाच अर्थ सद्यस्थितीत गुंतवणूकदारांना दीर्घ कालावधीचा विचार करूनच शेअर बाजारात पैसे गुंतवायला हवे.

तसंच, लक्षात ठेवा की बाजार अल्पावधीतच अस्थिर असतात आणि ते पुढेही राहतील. नकारात्मक बातम्या किंवा सेंटीमेंट्समुळे बाजारात थोडी घसरण होऊ शकते, परंतु बाजार कायम खाली राहत नाही. जेव्हा सेंटीमेंट्स सुधारतात तेव्हा ते मोठी वाढ दिसून येते. अशा प्रकारे, दीर्घकालीन गुंतवणूकदारासाठी, ही वेळ इक्विटीमध्ये गुंतवणूक करून दीर्घकाळ संपत्ती निर्माण करण्याची संधी आहे. दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी म्हटल्याप्रमाणं, जेव्हा इतरांना बाजाराची भीती वाटते तेव्हा तुम्ही गुंतवणूकीला प्राधान्य दिलं पाहिजे आणि जेव्हा इतर प्राधान्य देत असतात तेव्हा तुम्ही विक्री केली पाहिजे.

गुंतवणूकीचा गोल्डन रुलइक्विटीचा गोल्डन रुल हा आहे की तुम्ही आपलं असेट अलोकेशन निश्चित करा आणि दररोजच्या किंमतींच्या चढ-उताराकडे लक्ष देण्याऐवजी आपल्या गुंतवणूकीच्या उद्दिष्ट्यावर कायम राहा. म्युच्युअल फंड बजारातील जोखीम कमी करण्यासाठी एसआयपी, एसटीपीसारखे पर्याय देत आहे. सोबतच असेट अलोकेशन आणि गुंतवणूकीच्या पर्यायांना निश्चित करण्यासाठी मदत म्हणून प्रोफेशनल अॅडव्हायझर्स आणि म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर्सच्या सेवांचा उपयोग करा. गुतवणूकदारांनी गुंतवणूकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

(टीप - कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे,)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक