epfo members : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ही योजना खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करते. तुम्ही देखील ईपीएफओ (EPFO) सदस्य असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. सदस्यांना लवकरच कामगार मंत्रालयाकडून मोठी भेट मिळू शकते. वास्तविक, कामगार मंत्रालय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांना उच्च पेन्शनसाठी अधिक योगदान देण्याची योजना आखत आहे. यासाठी मंत्रालय कर्मचारी पेन्शन योजना १९९५ (EPS-95) मध्ये सुधारणा करण्याचा विचार करत आहे.
सध्या ईपीएफओ सदस्यांच्या पगाराच्या (मूळ वेतन आणि महागाई भत्ता) १२ टक्के रक्कम EPF खात्यात जाते. १२ टक्के नियोक्त्याच्या योगदानापैकी ८.३३ टक्के EPS-95 मध्ये जाते, तर उर्वरित ३.६७ टक्के EPF खात्यात जमा होते. एका सूत्राने सांगितले की जर सदस्यांनी त्यांच्या EPS-95 खात्यात अधिक योगदान दिले तर त्यांना अधिक पेन्शन मिळेल. त्यामुळे मंत्रालय ईपीएसमध्ये अधिक योगदान देण्याच्या पर्यायांचा विचार करत आहे.
मोदी सरकारचा रोजगार निर्मितीवर भर
सुधारित फ्रेमवर्क अंतर्गत पेन्शन लाभ वाढविण्यासाठी कर्मचाऱ्यांना EPS-95 मध्ये योगदान देण्याची परवानगी देखील दिली जाऊ शकते. सूत्राने सांगितले की, सामाजिक सुरक्षा लाभांमध्ये सुधारणा करण्यासोबतच नरेंद्र मोदी सरकार देशात रोजगार निर्मितीवरही भर देत आहे. ते म्हणाले की, अंदाजानुसार १ कोटी रुपयांच्या भांडवली खर्चातून ३ ते ६ नोकऱ्या निर्माण होतात. ४.१९ लाख कोटी रुपयांच्या मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात १.२६ कोटींहून अधिक रोजगार निर्माण होण्याचा अंदाज आहे.
UAN सक्रिय करण्यासाठी सूचना
कामगार आणि रोजगार मंत्रालयाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेला (EPFO) या संदर्भात सूचना केल्या आहेत. नियोक्त्यांच्या सहकार्याने मोहीम राबवणे आणि कर्मचाऱ्यांचे युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) सक्रिय करण्याचा यात समावेश आहे. पहिल्या टप्प्यात, ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत चालू आर्थिक वर्षात सामील होणाऱ्या त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी आधार-आधारित OTP द्वारे UAN सक्रिय करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, असे मंत्रालयाने २१ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. नुकत्याच रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांपासून याची सुरुवात होणार आहे. यानंतर इतर सर्व कर्मचाऱ्यांची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.