सुरक्षित गुंतवणूक आणि ठेवींवरील खात्रीशीर परताव्यासाठी भारतातील ग्राहकांमध्ये मुदत ठेवी (एफडी) हा सर्वात लोकप्रिय पर्याय आहे. जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात एफडीमध्ये पैसे जमा करून बंपर नफ्याची योजना आखत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियाची (एसबीआय) लोकप्रिय एफडी योजनेत गुंतवणूक करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत.
अमृत कलश ही ४०० दिवसांची विशेष एफडी योजना असून त्याअंतर्गत ग्राहकांना ७.६० टक्क्यांपर्यंत व्याज मिळतं. ३० सप्टेंबर २९२४ रोजी एसबीआय अमृत कलश एफडी योजना ग्राहकांसाठी बंद होईल. अमृत कलश योजनेला यापूर्वी एसबीआयने अनेकवेळा मुदतवाढ दिली आहे. एसबीआयने सर्वप्रथम १२ एप्रिल २०२३ रोजी अमृत कलश एफडी योजना सुरू केली होती. चला जाणून घेऊया एसबीआय अमृत कलश एफडी स्कीमबद्दल सविस्तर.
यापूर्वीही वाढवली डेडलाईन
ही योजना सुरू झाल्यानंतर एसबीआयनं अनेकवेळा आपली डेडलाइन वाढवली आहे. एसबीआयनं २३ जून २०२३ रोजी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ दिली. त्यानंतर बँकेनं ती पुन्हा ३१ मार्च २०२४ पर्यंत वाढवली. बँकेनं पुन्हा एकदा या विशेष एफडी योजनेची मुदत ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत वाढवली.
७.६०% पर्यंत व्याज मिळतं
एसबीआय अमृत कलश ही ४०० दिवसांची एफडी स्कीम आहे ज्यामध्ये सामान्य ग्राहकांना गुंतवणुकीवर जास्तीत जास्त ७.१०% व्याज मिळतं आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना अतिरिक्त ५० बेसिस पॉईंट्स म्हणजेच ७.६०% पर्यंत व्याज मिळतं. या योजनेअंतर्गत ग्राहक जास्तीत जास्त २ कोटी रुपयांपर्यंत रक्कम जमा करू शकतात.
अशा प्रकारे खातं उघडू शकता
एसबीआय अमृत कलश एफडी योजनेत गुंतवणूक करण्यासाठी ग्राहक त्यांच्या जवळच्या कोणत्याही शाखेत जाऊ शकतात. यासाठी तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साइज फोटो, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी आवश्यक असेल. यानंतर तुम्हाला बँकेकडून या योजनेसाठी एक फॉर्म मिळेल, जो भरल्यानंतर तुमचं खातं उघडलं जाईल.