Join us  

LIC ची भन्नाट ऑफर! ‘या’ स्कीममध्ये मिळतेय ७.७५ टक्के व्याज, नफा कमावण्याची नामी संधी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 2:17 PM

LIC ने आपल्या स्कीममधील व्याजदर वाढवले असून, यातून चांगला परतावा मिळू शकतो, असे सांगितले जात आहे.

LIC Housing Finance Fixed Deposit: भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC ही भारतातील सर्वांत मोठी आणि आघाडीची विमा कंपनी आहे. कोट्यवधी देशवासीयांना LIC च्या विविध प्रकारच्या पॉलिसी घेतल्या आहेत. पॉलिसींमधील वैविध्य आणि काळानुरुन योजना हे LIC च्या पॉलिसीची वैशिष्ट्ये असल्यामुळे इतक्या वर्षांनंतरही एलआयसीवरील देशवासीयांचा विश्वास कमी झालेला नाही. मात्र, यातच आता एलआयसीने एक जबरदस्त योजना आणली असून, त्यात ७.७५ टक्के व्याज मिळू शकते, असे म्हटले जात आहे. 

एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने त्यांच्या संचयी सार्वजनिक ठेवीवरील व्याजदरात वाढ केली आहे. हे दर २० कोटी रुपये आणि त्याहून अधिक ठेवींसाठी ऑफर केले जात आहेत आणि योजनेअंतर्गत ठेवी १ वर्ष, १८ महिने, २ वर्षे, ३ वर्षे आणि ५ वर्षांच्या कालावधीसाठी उपलब्ध आहेत. एलआयसीच्या गृहनिर्माण वित्त मुदत ठेवीचा विचार तुम्ही करू शकता. LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने (LIC HFL) १२ एप्रिल २०२३ पासून एकत्रित सार्वजनिक मुदत ठेवीवरील व्याजदरात वाढ केली आहे. HFL १ वर्ष ते ५ वर्षांच्या ठेवींवर ७.२५ टक्के ते ७.७५ टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहे.

LIC HFLने ऑफर केलेले व्याजदर नेमके काय आहेत?

२० कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर १ वर्षासाठी ७.२५ टक्के, १८ महिन्यांसाठी ७.३५ टक्के, २ वर्षांसाठी ७.६० टक्के, ३ वर्षांसाठी ७.७५ टक्के, ५ वर्षांसाठी ७.७५ टक्के व्याजदर ऑफर करण्यात आले आहेत. तर २० कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर १ वर्षासाठी ७.२५ टक्के, १८ महिन्यांसाठी ७.२५ टक्के, २ वर्षांसाठी ७.५० टक्के, ३ वर्षांसाठी ७.७५ टक्के, ५ वर्षांसाठी ७.७५ टक्के व्याज LIC HFLने ऑफर केले आहे. 

दरम्यान, १ वर्षाच्या ठेवीसाठी मासिक पर्यायावर ७ टक्के,  १८ महिन्यांच्या ठेवीसाठी मासिक पर्यायावर ७.१० टक्के, २ वर्षांच्या ठेवीसाठी मासिक पर्यायावर ७.३५ टक्के, ३ वर्षांच्या ठेवीसाठी मासिक पर्यायावर ७.५० टक्के आणि ५ वर्षांच्या ठेवीसाठी मासिक पर्यायावर ७.५० व्याज LIC HFL कडून ऑफर करण्यात आले आहे. तसेच १ वर्षासाठी वार्षिकी पर्यायावर ७.२५ टक्ते, १८ महिन्यांसाठी वार्षिकी पर्यायावर ७.३५ टक्के, २ वर्षांच्या ठेवीसाठी वार्षिकी पर्यायावर ७.६० टक्के, ३ वर्षांच्या ठेवींसाठी वार्षिकी पर्यायावर ७.७५ टक्के, ५ वर्षांच्या ठेवींसाठी वार्षिकी पर्यायावर ७.७५ टक्के व्याज LIC HFL ऑफर करत आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :एलआयसीगुंतवणूक