देशातील मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशननं (LIC) शुक्रवारी नवीन क्लोज-एंडेड प्लॅन धन वृद्धी लाँच केला. हा प्लॅन 23 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत विक्रीसाठी उपलब्ध असणार असल्याची माहिती एलआयसीनं दिली. धन वृद्धी ही एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, वैयक्तिक, बचत, सिंगल प्रीमियम लाइफ प्लॅन आहे. हा प्लॅन गुंतवणूकदारांना संरक्षण आणि बचतीचा लाभ देतो. या योजनेचे गुंतवणूकदार कधीही यातून बाहेर पडू शकतात किंवा प्लॅनवर कर्ज घेण्यासह 80C कर सवलतीचा लाभ घेऊ शकतात असंही यावेळी सांगण्यात आलं.
एलआयसीनुसार या प्लॅनमध्ये पॉलिसी टेन्योरदरम्यान इंश्योर्ड व्यक्तीचा मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत पुरवण्यात येते. इंश्योर्ड व्यक्तीला मॅच्युरिटीच्या तारखेवर गॅरंटीसह एकत्र रक्कमही मिळते. एलआयसीनं दिलेल्या माहितीनुसार हा प्लॅन निवडण्यासाठी दोन पर्याय देण्यात येतात. यात मृत्यूवर विमा रक्कम 1.25 पट आणि दुसऱ्या पर्यायात 10 पट असू शकते.
किती वर्षांसाठी?धन वृद्धी योजना 10, 15 आणि 18 वर्षांसाठी उपलब्ध आहेत आणि प्रवेशाच्या वेळी ग्राहकाचे किमान वय 90 दिवस ते 8 वर्षे असावे. तर, योजना घेण्यासाठी कमाल वयोमर्यादा कार्यकाळ आणि पर्यायानुसार 32 ते 60 वर्षांपर्यंत असते. या योजनेचे गुंतवणूकदार पॉलिसी कधीही सरेंडर करू शकतात आणि 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतची कर सूट देखील मिळवू शकतात.
कोणते बेनिफिट्स?ही योजना 1,25,000 रुपयांची किमान मूळ विमा रक्कम ऑफर करते. धन वृद्धी योजनेच्या पहिल्या पर्यायामध्ये 60 रुपये ते 75 रुपयांपर्यंत आणि दुसऱ्या पर्यायात प्रत्येक 1000 रुपयांच्या मूळ विमा रकमेसाठी 25 रुपये ते 40 रुपये अतिरिक्तची गॅरंटी मिळते. त्याच वेळी, मॅच्युरिटी किंवा मृत्यूनंतर पाच वर्षांसाठी मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक अंतरानं सेटलमेंट पर्यायाची सुविधा दिली जाईल. या योजनेचे गुंतवणूकदार पॉलिसीचे 3 महिने पूर्ण झाल्यानंतर कर्ज सुविधेचा लाभ घेऊ शकतात.