Join us

लुलू ग्रुप देशात 50000 नोकऱ्या देणार; 3 वर्षांत 10000 कोटींची गुंतवणूक करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 3:50 PM

Yusuff Ali MA: लुलू ग्रुपचे प्रमुख युसूफ अली यांनी या गुंतवणूकीबाबत माहिती दिली.

Lulu Group Mall: युनायटेड अरब अमिराती (UAE) येथील LuLu ग्रुप पुढील तीन वर्षांमध्ये भारतात असलेल्या त्यांच्या प्रकल्पांवर 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. लुलू ग्रुपचे अध्यक्ष युसूफ अली (Yusuff Ali MA) यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, आम्ही भारतात 20,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. भारतात 50,000 लोकांना रोजगार देण्याचे आमचे लक्ष्य आहे. आतापर्यंत त्यांनी देशात 22,000 हून अधिक नोकऱ्या दिल्या आहेत. म्हणजेच आगामी काळात लुलू ग्रुप आणखी 28,000 नोकऱ्या देणार आहे.

युसूफ अली यांनी असेही सांगितले की, लुलू समूहाने पुढील पाच वर्षांत तेलंगणातील डेस्टिनेशन शॉपिंग मॉलसह (रु. 3000 कोटी) विविध प्रकल्पांमध्ये सुमारे 3,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे. आम्ही शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स आणि फूड प्रोसेसिंग युनिट्स यासह विविध क्षेत्रात 20,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे आणि यापुढे ही गुंतवणूक आम्ही वाढवणार आहोत.

नोएडामध्ये फूड प्रोसेसिंग युनिट आगामी प्रकल्पांमध्ये एकूण गुंतवणुकीबद्दल विचारले असता, युसूफ अली म्हणाले, आम्ही अहमदाबादमध्ये शॉपिंग मॉलचे बांधकाम सुरू केले आहे. चेन्नईमध्येही एक शॉपिंग मॉल बांधत आहोत. एक फूड प्रोसेसिंग युनिट नोएडा आणि दुसरे तेलंगणात उभारले जात आहे. या सर्व प्रकल्पांमध्ये पुढील तीन वर्षांत 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.  

 

टॅग्स :भारतव्यवसायगुंतवणूक