फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच FD हे गुंतवणुकीचे एक साधन आहे ज्यामध्ये गुंतवणूकदारांना त्यांच्या पैशावर किती व्याज मिळेल आणि किती वर्षात किती रक्कम मिळेल हे आधीच माहित असते. आजकाल, लोक म्युच्युअल फंडामध्ये एसआयपीद्वारे गुंतवणूक करण्यास देखील पसंती देत आहेत. हे मार्केट लिंक्ड असल्यानं त्यात व्याजाची हमी नाही. परंतु गेल्या काही काळापासून यात उत्तम परतावा मिळत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
अशा परिस्थितीत, खात्रीशीर परताव्याच्या योजनांना प्राधान्य देणारे गुंतवणूकदार अनेकदा गुंतवणुकीसाठी दोन पर्यायांपैकी कोणते पर्याय निवडायचे याबद्दल संभ्रमात राहतात. जर तुम्हालाही अशा गोंधळाच्या परिस्थितीचा सामना करावा लागत असेल, तर आपण एफडी आणि म्युच्युअल फंडाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ.
व्याजाच्या बाबतीत कोण उत्तम?
एफडी करताना तुम्हाला एफडीचा जो व्याजदर सांगितला जातो, मॅच्युरिटीवर तुम्हाला त्या व्याजदरानुसार लाभ मिळतो. आज, बहुतेक बँका एफडीवर जास्तीत जास्त ८ टक्के व्याज देत आहेत. तर म्युच्युअल फंड बाजाराशी जोडलेले असतात. बाजारातील चढउताराचा परिणाम यावर दिसून येतो. पण जर तुम्ही त्यात एसआयपीद्वारे गुंतवणूक केली तर तुम्हाला सरासरी १२ टक्के व्याज मिळते, जे एफडीपेक्षा खूप चांगले आहे. हा परतावा यापेक्षाही अधिक असू शकतो.
कशात जास्त फ्लेक्सिबलिटी?
फ्लेक्सिबलिटीच्या दृष्टीनं पाहिलं तर म्युच्युअल फंड अधिक चांगले मानले जातात. जेव्हा तुम्हाला निधीची आवश्यकता असेल तेव्हा तुम्ही पैसे काढू शकता. तुम्ही सातत्यानं हप्ते भरण्यास सक्षम नसल्यास, तुम्ही काही काळासाठी ते थांबवू शकता. परंतु एफडीमध्ये असं होत नाही. एकदा तुम्ही ठराविक कालावधीसाठी पैसे गुंतवले, तर त्यापूर्वी तुम्ही पैसे काढू शकत नाही. ते पैसे काढायचे असल्यास तुम्हाला दंड भरावा लागतो.
कोण टॅक्सफ्रेंडली
टॅक्सच्या बाबतीतही म्युच्युअल फंड एफडी पेक्षा चांगले ठरू शकतात. म्युच्युअल फंडाच्या ELSS योजनेमध्ये, तुम्हाला फक्त तीन वर्षांच्या लॉक-इन कालावधीसाठी कर सूट मिळू शकते, परंतु एफडीमध्ये कराचा लाभ मिळवण्यासाठी, तुम्हाला किमान ५ वर्षे गुंतवणूक करावी लागेल. याशिवाय म्युच्युअल फंडाचा एक फायदा असा आहे की तुम्ही तो अगदी कमी रकमेनेही सुरू करू शकता. एसआयपी फक्त ५०० रुपयांनी सुरू करता येते.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)