Government MSSC Scheme : कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. तुम्ही या योजनांमध्ये कमी रकमेसह गुंतवणूक सुरू करू शकता, तसेच तुम्हाला खूप चांगल्या व्याजाचा लाभदेखील मिळतो. या छोट्या बचत योजना पोस्ट ऑफिसद्वारे चालवल्या जातात. यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारनं आणखी एक अल्पबचत पोस्ट ऑफिस योजना सुरू केली होती. निर्मला सीतारामन यांनी २०२३ च्या अर्थसंकल्पात महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना (MSSC) जाहीर केली होती. या योजनेशी संबंधित सर्व तपशील जाणून घेऊया.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना (MSSC) २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' साजरा करण्यासाठी जाहीर करण्यात आली होती आणि ती मुलींसह महिलांच्या आर्थिक समावेशन आणि सक्षमीकरणाच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण पाऊल मानलं जातं. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना दोन वर्षांच्या कालावधीसाठी फ्लेक्सिबल इन्व्हेस्टमेंट आणि २ लाख रुपयांच्या कमाल मर्यादेसह तसंच दर तीन महिन्यांनी चक्रवाढ व्याजासह आंशिक पैसे काढण्याची ऑफर देईल.
कधीपर्यंत योजनेची वैधता?महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना (MSSC) ही योजना ३१ मार्च २०२५ पर्यंत दोन वर्षांच्या कालावधीसाठी वैध आहे. जर आपण या योजनेत दिलेल्या व्याजाबद्दल सांगायचं झालं तर ग्राहकांना खूप चांगल्या व्याजदराचा लाभ मिळेल. या पोस्ट ऑफिस योजनेत ग्राहकांना ७.५ टक्के व्याजदराचा लाभ दिला जाणार आहे.
कोण करू शकतं अर्ज?वित्त मंत्रालयाने महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, २०२३ साठी अधिसूचना जारी केली आहे आणि ही योजना १.५९ लाख पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या योजेनेमध्ये गुंतवणूक करू शकता. तसेच, राष्ट्रीय बचत मासिक उत्पन्न खाते योजना, २०१९ मध्ये बदल करण्यात आले आहेत. आता या योजनेतील गुंतवणुकीची कमाल मर्यादा ४ लाख ५० हजार रुपयांवरून ९ लाख रुपये करण्यात आली आहे. सिंगल अकाऊंटसाठी गुंतवणुकीची मर्यादा ९ लाख रुपये आहे तर संयुक्त खात्यासाठी ती १५ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय पोस्ट ऑफिसच्या ज्येष्ठ नागरिक योजनेतही गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्यात आली आहे.
काय आहे खास?
- दोन वर्षांसाठी जास्तीत जास्त दोन लाख रुपये ठेव.
- ७.५ टक्के वार्षिक व्याज.
- किमान एक हजार रुपये देऊन खाते उघडता येतं.
- मॅच्युरिटी कालावधी ठेवीच्या तारखेपासून दोन वर्षांचा असेल.
- फक्त महिला आणि मुली हे खातं उघडू शकतात.
- खातं उघडण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२५ आहे.
- एका खात्यापेक्षा अनेक खाती देखील उघडता येतात.
- पॅन आणि आधार आवश्यक.