Join us  

Mahila Samman Savings Certificate : महिलांसाठीच्या 'या' विशेष स्कीमला मुदतवाढ मिळणार? मार्च पर्यंत करता येईल गुंतवणूक; मिळतात मोठे फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2024 2:32 PM

Mahila Samman Savings Certificate : मोदी सरकारनं २०२३ सालच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. भारतीय महिलांमध्ये बचतीच्या सवयीला प्रोत्साहन देणं हा त्यामागचा उद्देश होता. पाहा किती मिळतंय यावर व्याज.

Mahila Samman Savings Certificate: सरकारनं सन २०२३ च्या अर्थसंकल्पात महिलांसाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना सुरू केली. केंद्र सरकारची महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ही एकरकमी योजना आहे. ही योजना एप्रिल २०२३ ते मार्च २०२५ पर्यंत उपलब्ध आहे. आता महिला सन्मान बचत प्रमाणपत्राची मुदत वाढवण्याचा सरकारचा विचार नाही. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानं यासंदर्भातील माहिती दिली आहे.सरकारने २०२३ मध्ये योजनेची सुरुवात

मोदी सरकारनं २०२३ सालच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. भारतीय महिलांमध्ये बचतीच्या सवयीला प्रोत्साहन देणं हा त्यामागचा उद्देश होता. या योजनेअंतर्गत ठेवीदारांना वार्षिक ७.५ टक्के व्याज मिळत आहे. भारतात अनेक अल्पबचत योजना राबवल्या जातात, त्यापैकी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र आहे. 

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, सुकन्या समृद्धी योजना यांसारख्या योजनांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यात जास्तीत जास्त लोकांनी गुंतवणूक केलीये. भविष्यात या योजनांमधून मिळणारं उत्पन्न स्थिर राहू शकतं, ज्यातून केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२५ मध्ये राष्ट्रीय लघुबचत निधीतून (एनएसएसएफ) कमी कलेक्शनचं लक्ष्य ठेवलं आहे. मनी कंट्रोलनं यासंदर्भातील वृत्त दिलंय.

वाढीची अपेक्षा नाही

अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२४ मध्ये एनएसएसएफ संकलनात २०,००० कोटी रुपयांची घट झाली होती. त्यामुळे लो बेसपासून सुरुवात करत आहोत. दुसरं म्हणजे ज्येष्ठ नागरिक योजनेची व्याप्ती दुप्पट करून आम्हाला चांगलं उत्पन्न मिळालं. गेल्या वर्षी या योजनेमुळे आम्हाला १.१२ लाख कोटी रुपयांचा फायदा झाला होता. पण आता ते स्थिर होईल. यावेळी एवढ्या वाढीची अपेक्षा नाही.

जुलैमध्ये सादर करण्यात आलेल्या २०२४-२५ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात या आर्थिक वर्षासाठी एनएसएसएफ संकलनासाठी ४.२० लाख कोटी रुपयांचं उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, जे अंतरिम व्हर्जनमध्ये ४.६७ लाख कोटी रुपये होतं. एनएसएसएफकडून कमी कलेक्शनचं आणखी एक कारण म्हणजे लोकांचा कल आकर्षक परतावा मिळत असलेल्या इक्विटी मार्केट आणि म्युच्युअल फंडांकडे वाढतो आहे. सरकार आपला आर्थिक तोटा बॉन्ड बाजारातून कर्ज, अल्पबचतीतून मिळणारे उत्पन्न आणि रोख शिल्लक रकमेच्या माध्यमातून सरकार भरुन काढतं. 

काय मिळतो लाभ?

महिला सन्मान प्रमाणपत्र स्कीमचा लाभ पोस्ट ऑफिसद्वारे देखील घेता येऊ शकतो. पोस्ट ऑफिस महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणूक केल्यानं महिलांना कोणत्याही प्रकारच्या बाजारातील जोखमीचा सामना करावा लागणार नाही. यामध्ये तुम्हाला हमखास परतावा मिळेल. या योजनेअंतर्गत महिला २ वर्षांसाठी जास्तीत जास्त २ लाख रुपये जमा करू शकतात. तुम्हाला दोन वर्षांत गुंतवणुकीवर ७.५ टक्के निश्चित व्याजदर मिळेल. या योजनेत गुंतवणूक केल्यास सर्व महिलांना करसवलत मिळेल. या योजनेअंतर्गत, १० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलीही येथे त्यांचं खातं उघडू शकतात.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत, दोन वर्षांच्या कालावधीसाठी ७.५ टक्के दरानं व्याज दिलं जाईल. तुम्ही एकदा २ लाख रुपये गुंतवल्यास, तुम्हाला पहिल्या वर्षी १५,००० रुपये आणि दुसऱ्या वर्षी १६,१२५ रुपये परतावा मिळेल. म्हणजेच तुम्हाला दोन वर्षांत २ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर योजनेअंतर्गत ३१,१२५ रुपये व्याज उत्पन्न मिळेल. नियमांनुसार, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत १ वर्ष पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला आंशिक पैसे काढण्याची परवानगी मिळते. अशा परिस्थितीत तुम्ही जमा केलेल्या रकमेपैकी ४० टक्के रक्कम काढू शकता. म्हणजेच तुम्ही २ लाख रुपये जमा केले असतील तर एक वर्षानंतर तुम्ही ८० हजार रुपये काढू शकता.

टॅग्स :गुंतवणूकपैसासरकार