देशातील सर्वात मोठी हाऊसिंग फायनॅन्स कंपनी एचडीएफसीचं (HDFC) खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक HDFC बँकेत विलीनीकरणाची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. विलीनीकरण जूनपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या विलीनीकरणाचा परिणाम लोन घेणाऱ्यांपासून फिक्स्ड डिपॉझिट करणाऱ्यांपर्यंत होणार आहे. एचडीएफसीमध्ये जवळपास २१ लाख डिपॉझिट खाती आहेत. विलीनीकरणानंतर या ठेवीदारांसाठी काय बदल होईल ते जाणून घेऊया.
एचडीएफसी बँकेतील फिक्स्ड डिपॉझिटचे (FD) व्याजदर सामान्यतः हाऊसिंग फायनॅन्स कंपनी एचडीएफसीनं देऊ केलेल्या व्याजदरांपेक्षा कमी आहेत. उदाहरणार्थ, तुम्ही एचडीएफसीमध्ये ६६ महिन्यांच्या कालावधीसाठी २ कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवल्यास, तुम्हाला वार्षिक ७.४५ टक्के व्याज मिळेल. त्याच कालावधीसाठी एचडीएफसी बँकेचा व्याज दर ७ टक्के आहे. एचडीएफसी वार्षिक आधारावर व्याजदर देते, तर एचडीएफसी बँक मुदत ठेवींसाठी तिमाही आधारावर व्याज देते.
काय मिळेल पर्याय
इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, विलीनीकरणानंतर स्थापन होणाऱ्या नवीन कंपनीचं नाव एचडीएफसी बँक असेल. हाऊसिंग फायनॅन्स कंपनी एचडीएफसीच्या ठेवीदारांना एकतर त्यांचे पैसे काढण्याचा किंवा एचडीएफसी बँकेकडून देऊ केलेल्या व्याज दरानं ठेवींचं नूतनीकरण करण्याचा पर्याय मिळण्याची शक्यता आहे. जे लोक एचडीएफसी बँकेच्या सोबत आपल्या एफडींचं नुतनीकरण करत आहेत, त्यांना एचडीएफसीत मिळणाऱ्या व्याजदराच्या तुलनेत कमी व्याजदर मिळण्याची शक्यता आहे. ज्यांना हे पर्याय नको असतील त्यांची रक्कम मॅच्युरिटीनंतर आपोआप त्यांच्या खात्यात जमा केली जाईल.
याशिवाय ज्यांनी आपलं एफडी बुक करताना ऑटो रिनोवेटचा पर्याय निवडला आहे, त्यांना एचडीएफसी बँकेद्वारे देण्यात येणारं व्याज मिळेल. याशिवाय मुदतीपूर्वी रक्कम काढण्याच्या नियमातही बदल होण्याची शक्यता आहे.