Join us

केवळ बँक FD च नाही तर 'या' योजनांमध्येही पैसे गमावण्याची भिती नाही; मॅच्युरिटीवर मिळतो खात्रीशीर परतावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 4:50 PM

Fixed Income Instruments : शेअर बाजारातील अस्थिर परिस्थितीदरम्यान गुंतवणूकदारांना बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये पैसे गुंतवून तुम्हाला खात्रीशीर परतावा मिळू शकतो.

Fixed Income Instruments : सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हटलं की पहिल्या क्रमांकावर मुदत ठेव म्हणजे एफडी (फिक्स्ड डिपॉझिट्स) योजनेचं नाव येतं. मुदत ठेवीतील तुमची गुंतवणूक सुरक्षित असून तुम्हाला खात्रीशीर परतावाही मिळतो. सध्या सरकारी संस्था DICGC द्वारे भारतात बँक FD वर ५ लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण दिले जाते. यदाकदाचित बँक बुडाली तर हा विमा ५ लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई देतो. पण, बँक एफडी व्यतिरिक्त, गुंतवणूकदारांसाठी बाजारात अनेक गुंतवणुकीचे पर्याय आहेत. ज्यामध्ये पैसे गुंतवून मॅच्युरिटीवर चांगला परतावा मिळवू शकतात. याशिवाय त्यातील गुंतवणूकही सुरक्षित राहते.

आवर्ती ठेव (रेकरिंग डिपॉझिट्स RD)आवर्ती ठेव (RD) हे गुंतवणुकीचे एक साधन आहे. ज्यामध्ये गुंतवणूकदार दर महिन्याला खात्यात निश्चित रक्कम जमा करतो. RD मध्ये नियमितपणे थोडे पैसे जमा करून चांगले परतावा मिळू शकतो. यामध्ये सामान्य बचत ठेवींच्या तुलनेत जास्त व्याज मिळते.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) ही देशातील लोकप्रिय लहान बचत योजनांपैकी एक आहे. पीपीएफ योजना ही एक अशी योजना आहे, जी दीर्घ मुदतीत उत्कृष्ट परतावा देते. सध्या या योजनेत ७.१ टक्के दराने व्याज दिले जात आहे. PPF ची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ती सरकारच्या EEE योजनेत समाविष्ट आहे. EEE म्हणजे Exempt. म्हणजे त्यात जमा केलेले पैसे, मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे.

पोस्ट ऑफिस एमआयएस (POMIS)पोस्ट ऑफिस मंथली इन्कम अकाउंटद्वारे (POMIS) तुम्ही मासिक उत्पन्नाची सोय करू शकता. सध्या यावर ७.४ टक्के दराने व्याज मिळते. या योजनेत एकरकमी गुंतवणूक केल्यानंतर पुढील महिन्यापासून व्याज मिळण्यास सुरुवात होते. या योजनेअंतर्गत तुम्ही फक्त १,००० रुपयांच्या गुंतवणुकीत खाते उघडू शकता.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (NSC)राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) ही एक निश्चित उत्पन्न गुंतवणूक योजना आहे. या सरकारी योजनेत तुम्ही किमान फक्त १००० रुपये जमा करून खाते उघडू शकता. ही योजना ५ वर्षात परिपक्व होते. यात तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. एनएससी खाते उघडणाऱ्या गुंतवणूकदारांना यामध्ये ७.७ टक्के व्याज मिळते. 

टॅग्स :गुंतवणूकबँकिंग क्षेत्रपैसा