Financial Planning : कौन बनेगा करोडपती या टीव्ही मालिकेत नुकताच पार्श्वगायक सोनू निगम सहभागी झाला होता. यामध्ये यशाचं रहस्य सांगताना सोनू यांनी आपल्या वडिलांची शिकवण सांगितली. "एकतर आत्ता मौजमजा कर आणि नंतर धक्के खा किंवा मग आता मेहनत कर आणि नंतर ऐश", असं वडिलांनी सांगितल्याचं सोनू निगम म्हणाले. आपल्यालाही आयुष्यात अनेकदा कुणीतरी ह्या गोष्टी सांगत असतं. 20 वर्षे ते 30 वर्षे हा काळ प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाचा असतो. बहुतेक लोक या वयात त्यांच्या करिअरची सुरुवात करतात. जर तुम्हीही तुमच्या वयाच्या या टप्प्यावर असाल तर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जेणेकरून तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यात अडचणी येणार नाहीत.
जर तुम्ही वयाच्या ३० व्या वर्षापासून आर्थिक नियोजन गांभीर्याने करायला सुरुवात केली तर तुमच्या मुलांच्या शिक्षणापासून ते वृद्धापकाळापर्यंत सर्व काही सुरक्षित करण्यासाठी तुमच्याकडे फक्त ३० वर्षे आहेत. वयाच्या ३० व्या वर्षी तुम्ही कोणत्या गोष्टींवर काम करायला सुरुवात करावी हे जाणून घेऊ.
आरोग्य आणि आयुर्विमा आवश्यक
या वयात तुम्हाला कोणताही गंभीर आजार झाल्यास आयुष्यभराची जमापुंजी काही दिवसात रुग्णालयात खर्च होईल. अशा स्थितीत, तुम्ही वयाच्या ३० व्या वर्षी पोहोचेपर्यंत तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आरोग्य विमा घेणे आवश्यक आहे. तसेच विचार करा की जर तुमचा काही कारणाने मृत्यू झाला तर तुमच्या कुटुंबाचं पुढे काय होईल? अशात तुम्ही आयुर्विमा घेणे आवश्यक आहे.
गाडी की घर काय आधी घ्याल?
पहिली नोकरी किंवा व्यवसाय सुरू करताच प्रत्येकाच्या डोक्यात गाडी घेण्याचा विचार येतोच. मात्र, त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे स्वतःचं घर नसेल तर आधी घर घेण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. गाडी आवश्यकच असेल तर महागडी घेण्याऐवजी परवडेल अशी घेणे कधीही आवश्यक. बाजारात आजच्या घडीला इलेक्ट्रीक गाड्या आर्थिक दृष्टीने चांगल्या मानल्या जात आहेत. जर तुमच्याकडे घर असेल तर ते तुमची आर्थिक सुरक्षितता वाढवेल.
छोटी छोटी आर्धिक ध्येय
तुम्ही वयाच्या ३० वर्षापूर्वी अल्प-मुदतीची गुंतवणूक सुरू करावी, ज्याद्वारे तुम्ही तुमची अल्पकालीन उद्दिष्टे साध्य करू शकता. यामध्ये कार घेण्यासाठी पैसे जमा करणे, घर घेण्यासाठी पैसे जमा करणे, मुलांच्या शिक्षणासाठी आणि मुलांच्या लग्नासाठी पैसे जमा करणे यांचा समावेश आहे. प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळ्या कालावधीच्या गुंतवणूक योजना घेता येतात.
निवृत्तीचे नियोजन
या वयात बहुतेक लोक फक्त पैसे खर्च करण्याचा विचार करतात. परंतु, तुम्ही या वयापर्यंत पोहोचता तेव्हा तुम्ही सेवानिवृत्तीचे नियोजन देखील सुरू केले पाहिजे. यासाठी, तुम्ही NPS सारख्या सरकारी योजनेतू पैसे गुंतवू शकता, जे निवृत्तीसाठी सर्वोत्तम साधन आहे.
आपत्कालीन निधी
बहुतेक लोक आपल्या आयुष्यात कुठलीही गडबड होणार नाही. आपलं सुरळीत सुरू राहील या भ्रमात राहतात. अशा तरुणांना आपल्याकडे आपत्कालीन निधी असावा असा विचारही डोक्यात येत नाही. अशा परिस्थितीत, कोविड-19 सारखी आपत्ती किंवा इतर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास, आपण त्या परिस्थितीला तोंड देऊ शकत नाही. तुमचे वय ३० पर्यंत पोहोचेपर्यंत, तुम्ही आपत्कालीन निधी तयार करण्याचे नियोजन सुरू केले पाहिजे. हा निधी वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या रकमेचा असू शकतो. आपण पुढील ६ महिने कुठलंही उत्पन्न न कमावता राहू शकतो, इतका निधी तयार हवा.