Join us

Money Savings : कमी पगारातही श्रीमंतीचा 'बचत'मार्ग! या स्मार्ट टिप्स फॉलो करा अन् टेंशन फ्री व्हा

By राहुल पुंडे | Published: September 25, 2024 12:56 PM

Money Savings : तुम्ही कमी उत्पन्नातही तुमचे आर्थिक उद्दिष्ट गाठू शकता. यासाठी तुम्हाला शिस्तबद्ध राहून तुमच्या ध्येयाच्या दिशेने काम करावे लागेल. तुम्ही काही टिप्स फॉलो करुन यात यश मिळवू शकता.

Money Savings : काही दिवसांपूर्वी एका तरुणीची बातमी व्हायरल झाली होती. तीने अवघ्या ३० व्या वर्षी निवृत्ती घेतली होती. मात्र, यासाठी तिने नोकरी लागल्यापासून आर्थिक नियोजन करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे काहीच वर्षात ती आत्मनिर्भर झाली. भविष्यातील आर्थिक गरज आणि स्थैर्य प्राप्त करण्यासाठी आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. याचं पहिलं पाऊल म्हणजे बचतीस सुरुवात करणे. उत्पन्न कमी असल्याचे कारण देत अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. पण, तुम्ही काही स्मार्ट टीप्स फॉलो केल्या तर कमी उत्पन्न असूनही चांगली बचत करू शकता.

तुमच्या बजेटशी प्रामाणिक राहामहिन्याच्या पहिल्या दिवशी बजेट सेट करा आणि त्यावर शेवटपर्यंत कामय रहा. यामध्ये तुम्हाला किराणा सामान, वैयक्तिक खर्च, बिले इत्यादींवर मर्यादित रक्कम खर्च करण्यास मदत करेल. तुमची सर्व आवश्यक बिले मर्यादीत तारखेच्या आधी भरा. एकदा तुम्ही सर्व आवश्यक खर्च कव्हर केल्यानंतर तुमचं अर्ध टेंशन दूर होईल. आता तुमच्या उत्पन्नाचा काही भाग बचत म्हणून बाजूला ठेवा. हळूहळू तुमची बचत तुमच्या उत्पन्नाच्या १५% ते २०% पर्यंत वाढवा.

बचतीचं व्यसन लावाकोणतीही गोष्ट सातत्याने करत राहिल्यास त्या गोष्टीचं व्यसन लागतं असं म्हणतात. आपल्याला बचतीचं चांगलं व्यसन लावून घ्यायचं आहे. तुमच्या कमी उत्पन्नातून दरमहा ठराविक रक्कम वाचवण्यासाठी बचत करण्याची सवय लावली पाहिजे. तुम्हाला अल्पकालीन आणि दीर्घकालीन दोन्ही आर्थिक उद्दिष्टांचा विचार करणे आवश्यक आहे. हा दृष्टिकोन तुम्हाला खर्च करण्यापूर्वी बचत करण्याची आठवण करुन देत राहिल. कालांतराने तुम्हाला याचं व्यसन लागेल. जे तुम्हाला आर्थिक स्थिरता प्राप्त करण्यात मदत करेल. तुम्ही बँका किंवा इतर वित्तीय संस्थांमधील विविध बचत योजनांची निवड करू शकता. म्युच्युअल फंडातील मासिक एसआयपी किंवा मुदत ठेवी यासारख्या बचत योजनांचा पर्याय निवडून. तुम्ही दरमहा १०० रुपयांपेक्षा कमी पैशांतूनही बचत सुरू करू शकता.

कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करासध्या धकाधकीच्या आयुष्यात कधी कुणाला काय होईल? हे सांगता येत नाही. अशा स्थितीत आपल्या पश्चात कुटुंबाची फरफट होऊ नये यासाठी तरतूद करायला हवी. तुम्ही जर चांगल्या कंपनीचा आयुर्विमा (टर्म इन्शुरन्श) घेतला तर मृत्यूपश्चात कुटुंबाचं काय होईल? याची चिंता सतावणार नाही. टर्म इन्शुरन्स प्लॅनचे प्रीमियम खूप परवडणारे असतात. जे कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी आदर्श आहेत. तुम्ही आरोग्य विमा पॉलिसी देखील खरेदी केली पाहिजे. जी तुम्हाला वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीत आर्थिक मदत करते.

घरगुती खर्च कसा कमी कराल?कमी उत्पन्नात पैसे वाचवताना घरखर्च कमी करण्याचे अनेक मार्ग आहेत. तुम्ही अविवाहित असून एकट्यासाठी खोली भाड्याने घेतली असेल तर तुम्ही रूममेट घेऊन महिन्याचा खर्च वाचवू शकता. हे तुमचे भाडे अर्ध्यावर कमी करेल आणि पैशांची बचत करण्यात खूप मदत करेल. जर कुटुंब असेल तर मोठं घर घेण्याऐवजी तुम्ही लहान घरही निवडू शकता. मात्र, खूप गैरसोय होणार नाही, याचीही काळजी घ्या.

खाण्यापिण्याचं काय?जेवणासाठी योग्य बजेट ठरवणे महत्त्वाचे आहे. किराणा खरेदीसाठी बाहेर जाण्यापूर्वी तुमच्या रोजच्या अन्नाच्या गरजांची यादी करा. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या सेट बजेटला चिकटून राहू शकता. महागड्या वस्तू चांगल्याच असतात असे नाही. त्यामुळे किमतीच्या मोहात पडण्याऐवजी स्वस्तातही चांगले निवडू शकता. फक्त गुणवत्तेशी तडजोड न करणाऱ्या विक्रेत्याकडूनच माल खरेदी करा.

अनावश्यक खर्चाला कात्रीहुशारीने खर्च करण्याची सवय लावण्यासाठी अनावश्यक खर्च कमी करणे आवश्यक आहे. नेहमी काहीतरी नवीन खरेदी करण्याऐवजी, भाड्याने घ्या, उधार घ्या किंवा सेकंड-हँड वस्तू खरेदी करा. आजच्या काळात अनेक ॲप्स आणि सेल्स साइट्स कमी किमतीत वस्तू पुरवत आहेत. तुमची मेंबरशीप योजनांची पडताळणी करा. ज्यांची तुम्हाला यापुढे गरज नाही. यामध्ये जिम मेंबरशीप, स्ट्रीमिंग सेवा, ऑनलाइन मेंबरशीप आणि बरेच काही समाविष्ट आहे.

कर्जमुक्त हे पहिल्य ध्येयदीर्घकालीन आर्थिक योजना साध्य करण्यासाठी कर्ज फेडण्याला प्राधान्य दिले पाहिजे. शक्य तितक्या लवकर आपल्या डोक्यावरील भार हलका करा. यासाठी तुमच्या थकबाकीच्या रकमेची स्पष्ट कल्पना असली पाहिजे. नंतर तुमच्या मूळ मासिक खर्चावर परिणाम न करता त्यांची परतफेड करण्याची योजना बनवा. लक्षात ठेवा कोणतंही कर्ज तुमची बचत खात असते.

टॅग्स :गुंतवणूकपैसाशेअर बाजार