Join us  

पीएफमधून अधिक कमाई; ईटीएफचा परतावा पुन्हा बाजारात गुंतवण्यास केंद्र सरकारची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2023 7:05 AM

आता या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या परताव्याच्या आधारे कर्मचाऱ्यांना वाढीव व्याज देणे शक्य होणार आहे. 

नवी दिल्ली : सर्व कर्मचाऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे भविष्य निर्वाह निधीत जमा होणारा निधी आणि त्यावर मिळणारे व्याज. हे पैसे विविध योजनांमध्ये गुंतविले जातात. आता या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या परताव्याच्या आधारे कर्मचाऱ्यांना वाढीव व्याज देणे शक्य होणार आहे. 

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेला इलेक्ट्रॉनिक ट्रेडेट फंडात केलेल्या गुंतवणुकीतून मिळालेल्या परताव्यातील रकमेची पुन्हा शेअर बाजारात गुंतवणूक करणे शक्य होईल. केंद्र सरकारने ईपीएफओला यासाठी आवश्यक असलेली परवानगी दिली आहे. यामुळे ईपीएफओच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. त्यामुळे ईपीएफओच्या सभासदांनाही या नफ्याच्या तुलनेत अधिक व्याज देणे शक्य होणार आहे. ईपीएफओ शेअर बाजारात केवळ ईटीएफच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकते. यासाठी १५ टक्के इतकी मर्यादा घालून दिलेली आहे.

कुठे करणार गुंतवणूक? ईपीएफओने ईटीएफच्या माध्यमातून आतापर्यंत २ लाख कोटीहून अधिक गुंतवणूक केली आहे. अर्थ मंत्रालयाच्या सूचनेनुसार ईपीएफओला यातून मिळालेल्या परताव्यातील १ ५ टक्के रक्कम पुन्हा इक्विटी तसेच संबंधित फंड यात गुंतविता येतील.  बीएसई तसेच एनएसईमध्ये लिस्टेड असलेल्या  ५ हजार कोटींपेक्षा अधिक बाजार भांडवल असलेल्या कंपन्यांमध्ये ईपीएफओला पैसे गुंतविता येतील.

काय आहे ईटीएफ? यात अनेक पर्यायांना एकत्र केलेले असते. यामुळे स्टॉक्स, बाँड, करन्सी, इंडेक्स आणि कमोडिटीज या प्रकारांमध्ये गुंतवणूक केली जाते.

किती आहेत सभासद? ईपीएफओचे देशभरात६.५ कोटीहून अधिक सदस्य आहेत. त्यांच्या ख्यात्यावर सध्या ८.१५ टक्के इतके व्याज दिले जात आहे. सभासदांच्या खात्यात जमा असलेली रक्कम ईपीएफओकडून विविध ठिकाणी गंतुविली जाते. या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या फायद्यातून ईपीएफओला सभासदांना वाढीव व्याज देणे शक्य होत असते. 

टॅग्स :भविष्य निर्वाह निधीकेंद्र सरकार