India Rich list : गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील अब्जाधीशांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान, आता भारताने पहिल्यांदाच 1500 हून अधिक अब्जाधीशांचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. हुरुन इंडिया रिच लिस्ट 2024 नुसार, भारतात आता 1500 अब्जाधीश आहेत. 13 वर्षांपूर्वी केलेल्या यादीच्या तुलनेत ही संख्या सहा पट अधिक आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी देशात दर पाच दिवसांनी एक नवा अब्जाधीश निर्माण झाला.
या यादीतील 1,500 हून अधिक लोकांकडे ₹1,000 कोटी किंवा त्याहून अधिक संपत्ती आहे. सात वर्षांपूर्वीच्या तुलनेत यात 150% वाढ झाली आहे. दुसरीकडे, महिलांबद्दल बोलायचे झाले, तर 16 महिला व्यावसायिकांनी या यादीत स्थान मिळवले आहे. अरिस्ता नेटवर्क्सच्या सीईओ जयश्री उल्लाल 32100 कोटी रुपयांसह महिलांमध्ये टॉपवर आहेत. या यादीतील 272 अब्जाधीश नवीन आहेत.
या देशांमध्ये जीडीपीपेक्षा जास्त संपत्ती हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये समाविष्ट असलेल्या व्यक्तींची एकूण संपत्ती आता ₹159 लाख कोटी इतकी आहे. हा आकडा सौदी अरेबिया आणि स्वित्झर्लंडच्या एकत्रित GDP पेक्षा जास्त आहे, तर भारताच्या GDP च्या निम्म्याहून अधिक आहे. उल्लेखनीय म्हणजे, 1,334 व्यक्तींच्या संपत्तीत वाढ झाली आहे, तर 29 उद्योग आणि 42 शहरांमधून 272 नवीन अब्जाधीश या यादीत सामील झाले आहेत.
शाहरुख खान अब्जाधीशांच्या क्लबमध्ये सामील 58 वर्षीय बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानने कोलकाता नाईट रायडर्स आणि रेड चिलीज एंटरटेनमेंटमधील त्याच्या हिस्सेदारीच्या आधारे ₹7,300 कोटींच्या संपत्तीसह हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये स्थान मिळवले आहे. या यादीतील इतर बॉलिवूड कलाकारांमध्ये जुही चावला, हृतिक रोशन, करण जोहर आणि अमिताभ बच्चन यांचाही समावेश आहे.