Join us

देशातील 100 चॅनल्सवर असणार मुकेश अंबानी यांचा ताबा, सर्वात मोठा करार होणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2024 2:33 PM

मुकेश अंबानी मीडिया क्षेत्रातील सर्वात मोठी डील करणार आहेत.

Mukesh Ambani: रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी, हे भारतीय मीडिया इंडस्ट्रीतील सर्वात मोठे बनणार आहेत. एक करार होताच अंबानी यांच्या हातात देशभरातील 100 हून अधिक चॅनल आणि दोन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म असतील. रिपोर्ट्सनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि वॉल्ट डिस्नेचे विलीनीकरण जवळपास निश्चित मानले जात आहे. दोन्ही कंपन्यांमधील चर्चा पुढे गेली असून, Star India आणि Viacom18 च्या विलीनीकरणामध्ये 100 हून अधिक टीव्ही चॅनेल आणि दोन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. हे विलीनीकरण झाले, तर ते मीडिया उद्योगातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विलीनीकरण असेल.

कोणाचा वाटा किती असेल?Star-Viacom18 विलीनीकरण युनिटमध्ये रिलायन्सचा हिस्सा 51 टक्क्यांपेक्षा जास्त असू शकतो. तर, डिस्नेचा वाटा 40 टक्के असेल. उदय शंकर आणि जेम्स मर्डोक यांच्या बोधी ट्री सिस्टीम्सचा विलीनीकरण युनिटमध्ये हिस्सा 7-9 टक्के असू शकतो. माहितीनुसार, रिलायन्स विलीनीकरण युनिटमध्ये अतिरिक्त भांडवल गुंतवू शकते, जेणेकरून ही नवीन कंपनी थेट सहायक कंपनी म्हणून तयार करता येईल. विशेष म्हणजे, Star आणि Viacom18 ने 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात 25,000 कोटी रुपयांची एकत्रित कमाई केली होती.

टीव्ही आणि डिजिटलव्यतिरिक्त, या युनिटकडे इंडियन सुपर लीग आणि प्रो कबड्डी लीगचे हक्कदेखील असतील. मीडिया रिपोर्टनुसार, या प्रकरणाशी संबंधित एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, क्रिकेट हक्कांपासून होणारे नुकसान आणि डिस्ने + हॉटस्टारच्या ग्राहकसंख्येतील घसरण पाहता, रिलायन्सने स्टार इंडियाचे मूल्यांकन $4 अब्ज इतके केले आहे, ज्यामुळे संयुक्त युनिटचे मूल्यांकन $8 अब्ज झाले आहे. 

रिलायन्सच्या शेअर्समध्ये वाढ शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्येही वाढ दिसून आली. ट्रेडिंग सत्रात कंपनीच्या शेअर्सनी 3 टक्क्यांहून अधिक उसळी घेतली होती. बाजार बंद झाल्यानंतर कंपनीचे शेअर्स 2.18 टक्क्यांनी म्हणजेच 62.05 रुपयांच्या वाढीसह 2914.75 रुपयांवर बंद झाले. सोमवारी कंपनीचे शेअर्स 3000 रुपयांची पातळी ओलांडू शकतात. तसेच, कंपनीचे मार्केट कॅप 20 लाख कोटी रुपयांच्या पुढे जाऊ शकते.

(टीप- शेअर मार्केटमधील गुंतवणूक जोखमीची असू शकते. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्सव्यवसायगुंतवणूक