Mukesh Ambani : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) विविध प्रकारचे व्यवसाय करतात. यामध्ये कोल बेड मिथेन वायू उत्पादन व्यवसायाचाही समावेश आहे. कंपनीकडे मध्य प्रदेशातील सुहागपूर येथे कोल बेड मिथेन (CBM) चा ब्लॉक आहे, परंतु येथे गॅसच्या 300 विहिरी असूनही कंपनीच्या गरजा पूर्ण होत नाहीत. त्यामुळे आता मुकेश अंबानी यांच्या कंपनीने 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक योजना तयार केली आहे.
गॅसचे उत्पादन घटले
रिलायन्स इंडस्ट्रीजला सध्या या गॅस ब्लॉकमधून सीबीएमचे अपेक्षित उत्पादन मिळत नाहीये. दरम्यान, रिलायन्सची सब्सिडिअरी रिलायन्स गॅस पाइपलाईन लिमिटेड या गॅस फील्डमधून उत्तर प्रदेशातील फूलपुरपर्यंत 302 किमीची एक पाइपलाइन ऑपरेट करते. ही देशाच्या नॅशनल गॅस ग्रिडचा एक भाग आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने सांगितले की, सध्या 300 गॅस विहिरींमधून उत्पादन होत आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात त्यांचे सरासरी उत्पादन 0.64 MSCMD (गॅसच्या मोजमापाचे एकक) पर्यंत खाली आले आहे, जे आधी 2022-23 आणि 2021-22 आणि 2020-21 या आर्थिक वर्षांमध्ये 0.73 युनिट्स इतके होते.
कंपनी 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार
या क्षेत्रातील गॅस उत्पादन वाढवण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्यासाठी कंपनीने या क्षेत्रात अतिरिक्त गॅस विहिरी खोदण्याची योजना आखली आहे. यामुळे कंपनीला पुढील 3 वर्षांत पुन्हा सीबीएम उत्पादन 1 एमएससीएमडीपर्यंत वाढविण्यात मदत होईल. रिलायन्सचे सुहागपूर सीबीएम गॅस फील्ड सुमारे 995 स्क्वेअर किलोमीटरमध्ये पसरले आहे.
काय आहे CBM ?
CBM हा नैसर्गिक वायूचा एक प्रकार आहे. जमिनीखाली दडलेल्या कोळशातून हा गॅस बाहेर काढला जातो. या गॅसचा वापर कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) म्हणून केला जातो. या गॅसचा वापर वाहनांपासून ते विविध उद्योग स्तरावर केला जातो.