Mukesh Ambani Reliance Q3 Result : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे (Reliance Jio Q4 Results) रिपोर्ट कार्ड आले आहे. कंपनीने जानेवारी-मार्च 2024 तिमाहीत मोठा नफा मिळवला. हा नफा वार्षिक आधारावर 13 टक्क्यांनी वाढला आहे. निव्वळ नफ्यासह कंपनीच्या महसुलातही चांगली वाढ झाली आहे. मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी, रिलायन्स जिओची जबाबदारी सांभाळतो.
नफा वाढून 5337 कोटी रुपये झाला
सोमवारी चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना रिलायन्स जिओने सांगितले की, जानेवारी-मार्च तिमाहीत त्यांचा निव्वळ नफा एका वर्षापूर्वीच्या 4,716 कोटी रुपयांवरुन वाढून 5,337 कोटी रुपये झाला आहे. म्हणजेच, या निव्वळ नफ्यात 13.17 टक्के वाढ झाली आहे. यासह रिलायन्स जिओचा महसूल (Reliance Jio Revenue) 11 टक्के वाढून 2.40 लाख कोटी रुपये झाला आहे. या वाढीव नफ्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजने प्रति शेअर 10 रुपये लाभांशही जाहीर केला आहे. सोमवारी बीएसईवर रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स जवळपास 2960 रुपयांवर बंद झाले.
नफा वाढला की, खर्चही वाढतो...
रिलायन्स जिओ हा रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चा दूरसंचार व्यवसाय आहे. कंपनीकडून सांगण्यात आले की, कंपनीचा नफा आणि महसूल वाढल्याने रिलायन्स जिओचा एकूण खर्चही 10.2 टक्क्यांनी वाढला आहे. 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या तिमाहीत, कंपनीची एकूण मालमत्ता (Reliance Jio Assets) 4,87,405 कोटी रुपये होती, जी एका वर्षापूर्वी याच कालावधीत 4,45,772 कोटी रुपये होती. FY24 च्या चौथ्या तिमाहीत रिलायन्स जिओचे निव्वळ नफ्याचे मार्जिन 17.5 टक्क्यांपर्यंत वाढले, जे एका वर्षापूर्वी 17.1 टक्के होते.
भारतीय अर्थव्यवस्था मजबूत झाली
चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करण्याबरोबरच कंपनीने सांगितले की, रिलायन्स जिओ इन्फोकॉम Jio 5G नेटवर्क सेट करत आहे आणि सध्याची वायरलेस आणि वायरलाइन नेटवर्क क्षमता वाढवत आहे. तिमाही निकालांबाबत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले, भारतीय अर्थव्यवस्थेला पुढे नेण्यात रिलायन्सच्या सर्व व्यवसायांनी मोठे योगदान दिले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासोबतच सर्व विभागांनी अनेक टप्पे गाठले.