Join us  

Mukesh Ambani: मुकेश अंबानी आता मिठाई विकणार; देशातील प्रसिद्ध मिठाईवाल्यांसोबत रिलायन्सचा करार...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 7:53 PM

Mukesh Ambani: मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेलमध्ये देशभरातील 50हून अधिक मिठाईवाल्यांच्या मिठाई मिळतील.

Mukesh Ambani: रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी जवळ-जवळ सर्वच क्षेत्रात आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आहे. देशभरात रिलायन्सचे रिटेल स्टोअर्स आहेत. या स्टोअर्समध्ये आता देशभरातील प्रसिद्ध मिठाई मिळणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने यासाठी देशातील 50 हून अधिक प्रसिद्ध मिठाईवाल्यांसोबत करार केला आहे.

रिलायन्सची मोठी योजनाआता रिलायन्सच्या रिटेल स्टोअर्समध्ये विविध प्रकारच्या चॉकलेटसोबतच मिठाई आणि लाडूंची छोटी पाकिटे मिळणार आहेत. रिलायन्स रिटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी दामोदर मल्ल यांनी गुरुवारी एका निवेदनात सांगितले की, कंपनी आता देशातील प्रसिद्ध आणि पारंपारिक मिठाई विक्रेत्यांच्या खास मिठाई देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचवणार आहे. 

भारतात मिठाईचा मोठा बाजारपारंपारिक मिठाई एखाद्या विशिष्ट क्षेत्रापुरती मर्यादित न राहता देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावी, अशी आपली इच्छा असल्याचे मल्ल म्हणाले. ग्राहकांना ताजी मिठाई मिळावी यासाठी आम्ही पारंपारिक मिठाई विक्रेत्यांसोबत काम करत आहोत, अशीही माहिती त्यांनी दिली. विशेष म्हणजे, सध्या भारतात पॅकेज्ड मिठाईची बाजारपेठ सुमारे 4,500 कोटी रुपयांची आहे आणि पुढील पाच वर्षांत ही 13 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. तसेच, असंघटित मिठाई बाजार 50 हजार कोटींचा आहे.

स्टोअरमध्ये स्वतंत्र युनिट असेलमॉल यांच्या म्हणण्यानुसार, पारंपारिक मिठाईची विक्री वाढवण्यासाठी रिलायन्स रिटेलने त्यांच्या स्टोअरमध्ये स्वतंत्र युनिट्स सुरू केल्या आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिलायन्स रिटेलचे म्हणणे आहे की, या उपक्रमामुळे या मिठाई विक्रेत्यांना मोठी बाजारपेठ मिळेल आणि त्यांचा व्यवसायही वाढेल. तसेच, ग्राहकांनाही आपल्या पसंतीची मिठाई खाता येईल.

टॅग्स :मुकेश अंबानीव्यवसाय