Join us

मुकेश अंबानींची मोठी घोषणा; 'या' राज्यात करणार ₹65000 कोटींची गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 4:34 PM

याद्वारे राज्यातील अडीच लाख लोकांना रोजगार मिळणार.

RIL Investment in Andhra Pradesh: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने गुजरातच्या बाहेर क्लीन एनर्जी योजनेअंतर्गत जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी पुढील पाच वर्षांत आंध्र प्रदेशमध्ये 500 कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) प्रकल्प उभारणार आहे. यासाठी 65,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. 

इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, प्रत्येक प्लांटसाठी 130 कोटी रुपये खर्च केले जाणार असून, ते राज्यातील विविध ठिकाणी मोकळ्या जागेवर उभारले जाणार आहे. या प्रकल्पांमुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या अडीच लाख लोकांना रोजगार मिळेल, असा राज्य सरकारचा अंदाज आहे.

आज करारावर होणार स्वाक्षरी मुंबईत हा प्लान फायनल झाला होता. यावेळी रिलायन्सच्या क्लीन एनर्जी इनिशिएटिव्हचे प्रमुख अनंत अंबानी आणि आंध्र प्रदेशचे आयटी मंत्री नारा लोकेश उपस्थित होते. मंगळवारी विजयवाडा येथे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या उपस्थितीत रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आंध्र प्रदेशच्या उद्योग विभागादरम्यान सामंजस्य करारावर स्वाक्षरी होणार आहे. आंध्र प्रदेश सरकारने राज्याच्या नुकत्याच अधिसूचित केलेल्या एकात्मिक स्वच्छ ऊर्जा धोरणांतर्गत जैवइंधन प्रकल्पांसाठी प्रोत्साहने सुरू केली आहेत.

रिलायन्सने आंध्र प्रदेशात यापूर्वीच मोठी गुंतवणूक केली यामध्ये राज्य GST (SGST) ची पूर्ण परतफेड आणि पाच वर्षांसाठी वीज शुल्क आणि CBG प्लांटवरील स्थिर भांडवली गुंतवणुकीवर 20% भांडवली सबसिडी समाविष्ट आहे. आयटी मंत्री नारा लोकेश म्हणाले की, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आम्ही आमच्या एकात्मिक स्वच्छ ऊर्जा धोरणात अनेक बदल केले आहेत.

250,000 नवीन रोजगार निर्माण करण्याच्या संधीबद्दल मंत्री महोदयांनी कौतुक केले. राज्यातील तरुणांसाठी हा 'गेम चेंजर' ठरेल, असे ते म्हणाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स केवळ सरकारी नापीक जमिनीचे पुनरुज्जीवन करणार नाही, तर शेतकऱ्यांसोबत काम करेल आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांना ऊर्जा पिकांच्या लागवडीचे प्रशिक्षण देईल. 

टॅग्स :मुकेश अंबानीआंध्र प्रदेशरिलायन्सगुंतवणूक