India vs China: गेल्या काही वर्षांमध्ये भारताची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात आहे. आज जगभरातील अनेक देश भारतात गुंतवणूक करत आहेत. उत्पादन असो किंवा इथर कुठलेही क्षेत्र, भारत चीनला सातत्याने मागे टाकत आहे. आता आणखी एका गोष्टीत भारताने चीनला मागे टाकले आहे. भारताची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर चीनच्या बीजिंगला मागे टाकून आशिया खंडात पहिल्या क्रमांकावर आले आहे.
कोणत्या बाबतीत मुंबई पहिल्या क्रमांकावर आले ?हुरुन रिसर्चच्या 2024 च्या ग्लोबल रिच लिस्टनुसार, मुंबईने बीजिंगला मागे टाकत पहिल्यांदाच आशियातील सर्वाधिक मोठे अब्जाधीश शहर होण्याचा मान मिळवला आहे. बीजिंगमध्ये 91 अब्जाधीश आहेत, तर भारताच्या आर्थिक राजधानीतील अब्जाधिशांची संख्या 92 झाली आहे. पण, एकूण देशाचा विचार केल्यास, भारतात 271 तर चीनमध्ये 814 अब्जाधीश आहेत. विशेष म्हणजे अब्जाधीशांच्या बाबतीत मुंबई आता जगातील तिसरे मोठे शहर बनले आहे. पहिल्या स्थानी न्यूयॉर्क आहे, जिथे 119 अब्जाधीश राहतात. त्यानंतर लंडनचा क्रमांक लागतो, जिथे 97 अब्जाधीश आहेत.
मुंबईतील अब्जाधीशांच्या संपत्तीत वाढगेल्या वर्षी मुंबईथ 26 नवीन अब्जाधीशांची वाढ झाली. त्यामुळे या शहरात राहणाऱ्या अब्जाधीशांची एकूण संपत्ती 445 अब्ज डॉलर झाली आहे. हा आकडा गतवर्षीच्या तुलनेत 47 टक्के अधिक आहे. याउलट, बीजिंगच्या अब्जाधीशांची एकूण संपत्ती 265 अब्ज डॉलर आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 28 टक्क्यांनी घसरली आहे. मुंबईच्या अब्जाधीशांच्या संपत्तीत वाढ करणाऱ्या क्षेत्रांमध्ये ऊर्जा आणि फार्मास्युटिकल्सचा समावेश आहे.
अदानी आणि अंबानी यांच्या संपत्तीत वाढमुंबईतील अब्जाधीशांमध्ये रिअल इस्टेट व्यापारी मंगल प्रभात लोढा आणि त्यांच्या कुटुंबाच्या एकूण संपत्तीमध्ये सर्वाधिक 116 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, जागतिक पातळीवर भारतीय अब्जाधीशांच्या क्रमवारीत अनेक चढ-उतार झाले. मुकेश अंबानी 10 व्या स्थानावर कायम राहिले, तर गौतम अदानी आठ स्थानांनी पुढे सरकत 15व्या स्थानावर पोहोचले.
या अब्जाधीशांच्या संपत्तीत वाढ सन फार्मास्युटिकल्सचे दिलीप सांघवी आणि कुमार मंगलम बिर्ला यांच्या संपत्तीत वाढ झाली. याशिवाय, एचसीएलच्या शिव नाडर कुटुंबाच्या नेट वर्थ आणि जागतिक क्रमवारीत वाढ झाली आहे. शिव नाडर 16 स्थानांनी वर येत 34व्या स्थानावर पोहोचले. याउलट सिरम इन्स्टिट्यूटचे सायरस एस पूनावाला नऊ स्थानांनी घसरुन 55व्या स्थानावर गेले. DMart च्या यशामुळे राधाकिशन दमाणी यांच्या संपत्तीत सातत्याने वाढ होत असून, ते जागतिक क्रमवारित 100 व्या स्थानावर पोहोचले आहेत.