रिटायरमेंटच्या प्लॅनिंगनुसार (Retirement Planning) आर्थिक नियोजन (Financial Planning) करणाऱ्या लोकांसाठी नॅशनल पेन्शन स्कीम (National Pension Scheme) ही अतिशय महत्त्वाची योजना आहे. या योजनेत पैसे गुंतवण्याचे अनेक फायदे आहेत. सर्वप्रथम याला केंद्र सरकारचा पाठिंबा आहे. याशिवाय इन्कम टॅक्स सूट, ठेवी आणि पैसे काढण्याबाबतचे अनेक पर्याय ही योजना आकर्षक बनवतात. एनपीएसशी संबंधित इतरही अनेक गोष्टी आहेत आणि त्या खाते उघडण्यापूर्वी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. NPS खाते उघडताना थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला कर सवलतीच्या लाभापासून वंचित ठेवू शकतो. आज आम्ही तुम्हाला एनपीएसशी संबंधित अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या जाणून घेतल्यावर तुम्हाला निर्णय घेणे सोपे होईल.
अनेक गोष्टी समान
नॅशनल पेन्शन स्कीममध्ये दोन प्रकारची खाती उघडली जातात. पहिल्या प्रकारचे खाते NPS टियर-1 म्हणून ओळखले जाते, तर दुसऱ्या प्रकारच्या खात्याला NPS टियर-2 असे म्हणतात. जरी दोन्ही प्रकारच्या खात्यांमध्ये अनेक समानता आहेत, परंतु या दोन्हीमध्ये काही मोठे फरक देखील आहेत. दोन्ही प्रकारच्या खात्यांचे त्यांचे फायदे आणि तोटे आहेत. दोघांची रचना सारखीच आहे. दोन्ही खाते प्रकारांमध्ये शुल्क आणि फंड स्कीमचे पर्याय जवळजवळ सारखेच आहेत. आता NPS Tier-1 आणि Tier-2 खात्यांमध्ये (NPS Tier1 Vs Tier2) ध्काय फरक आहेत ते जाणून घेऊया.
रिटायरमेंटनुसार टिअर 1 उत्तम
कर आणि गुंतवणूक तज्ज्ञ बलवंत जैन (Tax & Investment Expert Balwant Jain) स्पष्ट करतात की जर एखाद्याला एनपीएसचे फायदे मिळवायचे असतील तर त्याच्यासाठी टियर-1 खाते हा एकमेव पर्याय आहे. टियर-1 खाते मुख्यतः अशा लोकांसाठी आहे ज्यांचे पीएफ जमा होत नाही आणि त्यांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा हवी आहे. या प्रकारचे खाते म्हणजेच NPS टियर-1 केवळ सेवानिवृत्तीनुसार तयार करण्यात आलेले आहे. यामध्ये तुम्ही किमान 500 रुपये जमा करून खाते उघडू शकता. निवृत्तीनंतर, तुम्ही एकाच वेळी 60 टक्के रक्कम काढू शकता. उर्वरित 40 टक्के रकमेतून एन्यूटीज खरेदी केल्या जातात, जे मासिक पेन्शनच्या रूपात नियमित उत्पन्नाचा स्रोत सुनिश्चित करते.
टियर 1 खातं आवश्यक
टियर-1 आणि टियर-2 खात्यातील सर्वात मोठा फरक म्हणजे टियर-2 खाते उघडण्यासाठी टियर-1 खाते असणे आवश्यक आहे. टियर-1 खाते उघडल्याशिवाय तुम्ही NPS टियर-2 खाते उघडू शकत नाही. NPS टियर-2 खाते हे एक प्रकारे बचत खात्यासारखे आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या गरजेनुसार पैसे जमा करू शकता आणि तुमच्या गरजेनुसार पैसे काढू शकता. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही एकाच वेळी संपूर्ण रक्कम काढू शकता. किमान 1000 रुपये भरून ते उघडता येईल. NPS टियर-1 मध्ये दरवर्षी किमान एकदा पैसे जमा करणे बंधनकारक आहे, तर टियर-2 मध्ये अशी कोणतीही सक्ती नाही, असं जैन म्हणतात.
टॅक्स सूटमध्ये हा फरक
दोन्ही प्रकारच्या NPS खात्यांमधील आणखी एक महत्त्वाचा फरक म्हणजे आयकर लाभ (Income Tax Benefits). NPS टियर-1 खात्याच्या बाबतीत, खातेधारकाला आयकर कायदा 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत आणि 80CCD (1B) अंतर्गत 50,000 रुपयांपर्यंतच्या टॅक्स डिडक्शनचा लाभ मिळतो.
दुसरीकडे, टियर-2 खात्याच्या बाबतीत, असा कोणताही लाभ मिळत नाही. 2019 पासून यामध्ये काही बदल देखील करण्यात आले होते, परंतु आता फक्त केंद्र सरकारी कर्मचारीच NPS टियर-2 खात्यावर कर लाभ घेऊ शकतात. दरम्यान, कर सूट मिळविण्यासाठी 03 वर्षांचा लॉक-इन कालावधीची देखील याला अट आहे. दरम्यान, हे कॉन्ट्रिब्यूशन बद्दल झालं. आता दोन्ही पर्यायांमध्ये पैसे काढण्याबाबतही जाणून घेऊ.
NPS टियर-1 खात्यातून काढलेली संपूर्ण रक्कम करमुक्त आहे. दुसरीकडे, जर तुम्ही टियर-2 खात्यातून पैसे काढले, तर काढलेली रक्कम करपात्र उत्पन्न मानली जाईल. या उत्पन्नावर तुम्हाला तुमच्या स्लॅबनुसार आयकर भरावा लागेल.