Join us

National Pension System: NPS अकाऊंट फ्रिज झालाय का? जाणून घ्या अ‍ॅक्टिव्हेट करण्याची सोपी पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 12:16 PM

रिटायरमेंट फंड जमा करण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना उपलब्ध आहेत, एनपीएस त्यापैकी एक आहे.

निवृत्तीचं नियोजन अगोदरच करणं गरजेचं आहे, जेणेकरून वृद्धापकाळात तुमच्या आयुष्यात पैशाचं कोणतेही टेन्शन येणार नाही याची खात्री होते. रिटायरमेंट फंड जमा करण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना उपलब्ध आहेत, एनपीएस (National Pension System-NPS) त्यापैकी एक आहे. यामध्ये खातेदाराला बाजार आधारित परतावा मिळतो. एनपीएसमध्ये दोन प्रकारे पैसे गुंतवले जातात. पहिला टियर-1 जे ​​रिटायरमेंट अकाऊंट आहे आणि दुसरं टियर-2 जे वॉलेंटरी अकाऊंट आहे. एनपीएसमध्ये गुंतवलेल्या एकूण रकमेपैकी 60 टक्के रक्कम तुम्ही 60 वर्षांचे झाल्यावर एकरकमी घेऊ शकता, तर 40 टक्के हिस्सा तुम्ही एन्युटी म्हणून वापरता येतो. 

अशाप्रकारे, एनपीएसद्वारे, तुम्ही तुमच्या वृद्धापकाळासाठी मोठा निधी आणि पेन्शन दोन्हीची व्यवस्था करू शकता. दुहेरी लाभ देणाऱ्या या योजनेत योगदानादरम्यान झालेली एक चूक तुमचं खातं गोठवू शकते. दरम्यान, तुम्ही गोठलेलं खाते पुन्हा सक्रिय करू शकता. एनपीएस खातं का निष्क्रिय होतं आणि निष्क्रिय खातं पुन्हा कसं सक्रिय करायचं ते येथे जाणून घेऊ. 

कोणत्या कारणानं फ्रिज होतं अकाऊंट? 

एनपीएसचे सदस्य होण्यासाठी, टियर 1 खातं उघडणं आवश्यक आहे. यानंतर, सदस्याची इच्छा असल्यास, तो टियर 2 खाते देखील उघडू शकतो. खातं उघडताना, तुम्हाला टियर 1 मध्ये 500 रुपये आणि टियर 2 मध्ये 1000 रुपये गुंतवावे लागतील. यानंतर, टियर 1 मध्ये वार्षिक किमान 500 रुपये आणि टियर 2 मध्ये वार्षिक किमान 250 रुपये जमा करणं आवश्यक आहे. जास्तीत जास्त योगदानावर कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही कोणत्याही वर्षात किमान निर्धारित रक्कम जमा न केल्यास तुमचं एनपीएस खातं गोठवलं जाऊ शकतं किंवा निष्क्रिय केलं जाऊ शकतं. 

पुन्हा कसं अॅक्टिव्हेट करू शकता? 

  • गोठवलेले खाते पुन्हा सक्रिय करण्यासाठी, तुम्हाला UOS-S10-A फॉर्म भरावा लागेल. हा फॉर्म तुम्हाला पोस्ट ऑफिसमधून मिळतो किंवा तुमचx एनपीएस सुरू असलेल्या ठिकाणाहून तुम्ही हा फॉर्म घेऊ शकता.
  • तुम्ही फॉर्म ऑनलाइन देखील डाउनलोड करू शकता. यासाठी तुम्हाला https://npscra.nsdl.co.in/download/non-government-sector/all-citizens-of-india/forms/UoS-S10A-Unfreezing%20of%20PRAN.pdf या लिंकवर क्लिक करावं लागेल.
  • फॉर्मसोबत ग्राहकांच्या PRAN कार्डची प्रतही जोडावी लागेल. याशिवाय, ग्राहकाला वार्षिक योगदानाची थकबाकी रक्कम खात्यात जमा करावी लागेल आणि 100 रुपये दंड देखील भरावा लागेल.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर, कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून तुमच्या खात्याची पडताळणी केली जाते. यानंतर तुमच्या अर्जावर प्रक्रिया केली जाते आणि पीआरएएन सक्रिय होतो.
टॅग्स :निवृत्ती वेतनसरकारगुंतवणूक