Join us  

Tax Free FD पेक्षा जास्त व्याज देईल पोस्टाची 'ही' स्कीम, मुलांच्या नावानंही करू शकता गुंतवणूक; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 2:34 PM

पोस्ट ऑफिसची एक स्कीम आहे जी तुमचा टॅक्सही वाचवेल आणि तुम्हाला ५ वर्षाच्या एफडीपेक्षा चांगलं व्याज देखील देऊ शकते.

फिक्स्ड डिपॉझिट हा गुंतवणूकीचा पर्याय आजही लोकप्रिय आहे. ५ वर्षांच्या एफडीला टॅक्स फ्री एफडी (Tax Free FD) म्हणतात. अनेक लोक कर वाचवण्यासाठी या एफडीमध्ये गुंतवणूक करतात. पण पोस्ट ऑफिसची एक स्कीम आहे जी तुमचा टॅक्सही वाचवेल आणि तुम्हाला ५ वर्षाच्या एफडीपेक्षा चांगलं व्याज देखील देऊ शकते. आम्ही पोस्ट ऑफिसच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राबद्दल (National Savings Certificate) बोलत आहोत, ही देखील एफडी सारखी एक डिपॉझिट स्कीम आहे ज्यामध्ये ५ वर्षांसाठी पैसे जमा केले जातात. सध्या या योजनेत ७.७ टक्के दरानं व्याज दिलं जात आहे. जाणून घेऊया याबद्दल खास गोष्टी. 

Tax Free FD वर किती व्याज? 

पोस्ट ऑफिस - ७.५%स्टेट बँक - ६.५%पंजाब नॅशनल बँक - ६.५%बँक ऑफ इंडिया - ६.५%HDFC - ७%ICICI - ७% 

एनएससीमध्ये गुंतवणूक करू शकता 

कोणताही भारतीय नागरिक पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये गुंतवणूक करू शकतो. जर तुम्हाला तुमच्या मुलाच्या नावानं खातं उघडायचं असेल तर तुम्ही ते देखील उघडू शकता. त्याच वेळी, १० वर्षांपेक्षा जास्त वयाचे मूल देखील स्वतःच्या नावानं एनएसई खरेदी करू शकते. यामध्ये दोन ते तीन लोकही संयुक्त खातं उघडू शकतात.  

किती गुंतवणूक करू शकता? 

तुम्ही एनएससीमध्ये किमान १००० आणि त्यानंतर १०० रुपयांच्या पटीत गुंतवणूक करू शकता. जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही. ही योजना अवघ्या ५ वर्षात मॅच्युअर होते. यामध्ये वार्षिक चक्रवाढ व्याज मिळतं आणि हमी परतावाही मिळतो. तुमच्या गुंतवणुकीच्या वेळी लागू होणाऱ्या व्याजदरानुसार ५ वर्षांसाठीचा व्याजदर मोजला जातो. यादरम्यान व्याजदर बदलला तरी त्याचा तुमच्या खात्यावर परिणाम होत नाही. 

कर सूट मिळते 

एनएससीमध्ये जमा केलेल्या रकमेवर कलम 80C अंतर्गत कर सूट उपलब्ध आहे, म्हणजेच दरवर्षी १.५० लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर कर सूट मिळू शकते. इतर योजनांप्रमाणे, ५ वर्षापूर्वी या योजनेत आंशिक पैसे काढता येत नाहीत. याचा अर्थ, तुम्हाला संपूर्ण रक्कम एकाच वेळी ५ वर्षांनंतर मिळेल. 

टॅग्स :पोस्ट ऑफिसगुंतवणूक